कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात शनिवारी (10 डिसेंबर) तिसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळला गेला. तिसऱ्या सामन्यात या स्पर्धेत अनपेक्षित कामगिरी करत आलेल्या मोरोक्कोने ख्रिस्टीयानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला 1-0 असे पराभूत करत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला. मोरोक्कोचा गोलरक्षक यासीन बोनो हा त्यांच्या विजयाचा नायक ठरला. मात्र, याच बोनोचे भारताशीही जवळचे नाते आहे.
बोनो हा मोरोक्कोच्या या यशाचा सर्वात मोठा नायक ठरलेला आहे. कारण, आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच सामन्यात केवळ एकदाच विरोधी संघ त्याचा गोलपोस्ट भेदू शकला आहे. साखळी फेरी कॅनडाने हा गोल केला होता. उपउपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या तर उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालच्या तगड्या स्ट्रायकर्सला त्याने रोखण्याची कामगिरी केली. विश्वचषकात नाव कमावत असलेला हाच बोनो थेट भारतात खेळलेला आहे.
आयएसएल संघ केरला ब्लास्टर्स संघाने 2018 मध्ये एक मैत्रीपूर्ण स्पर्धा भरवलेली होती. यामध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न सिटी एफसी व स्पेनमधील गिरोना संघ सहभागी झालेला. त्यावेळी बोनो हा गिरोना संघाचा सदस्य होता. कोची येथे खेळल्या गेलेल्या मेलबर्न सिटी एफसी विरुद्ध गिरोना या सामन्यात गिरोनाने मेलबर्नचा 6-0 असा पराभव केलेला. त्यात बोनोने गोल स्वीकारला नव्हता. मात्र, केरला ब्लास्टर्स विरुद्धच्या सामन्यात बोनोला विश्रांती देण्यात आलेली.
अल थुमामा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को सामन्यात पोर्तुगाल संघाला विजयाचे दावेदार मानले जात होते. सलग दुसऱ्या सामन्यात पोर्तुगाल संघाच्या मॅनेजरने अनुभवी ख्रिस्टियानो रोनाल्डो याला बाकावर बसवले. असे असले तरी पोर्तुगाल संघ आक्रमक खेळ दाखवत होता. पहिल्या हाफच्या अखेरीकडे खेळ चालला असतानाच, युसेफ एन नेसरी याने 42 व्या मिनिटाला गोल करत मोरोक्कोला आघाडीवर नेले. दुसऱ्या हाफमध्ये पोर्तुगालने रोनाल्डो याला देखील मैदानात उतरवले. तसेच, अखेरच्या दहा मिनिटात मोरोक्को संघ दहा खेळाडूंसह खेळला. तरीही, पोर्तुगाल संघ बरोबरी साधण्यात अपयशी ठरला. या विजयासह मोरोक्को फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला आफ्रिकन संघ बनला.
(Yassine Bono Morocco Goalkeeper Relation With India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-