टोकियोमध्ये सध्या पॅरालिम्पिकचा थरार रंगला आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. सोमवारी (३० ऑगस्ट) भारताच्या योगेश कथूनियाने पॅरालिम्पिकमधील पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत एफ56 प्रकारात रौप्य पदक जिंकले. वयाच्या आठव्या वर्षी अर्धांगवायू झालेल्या योगेशने सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात 44.38 मीटर थाळी फेकून दुसरे स्थान मिळवले.
ब्राझीलच्या बतिस्ता डॉस सँतोसने 45.59 मीटर फेकीसह सुवर्ण, तर क्युबाच्या लिओनार्डो डियाझ अल्डाना (43.36 मीटर) ने कांस्य पदक जिंकले. पॅरालिम्पिक स्पर्धेत थाळीफेक स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकणारा योगेश पहिला भारतीय खेळाडू आहे.
वर्ल्ड पॅराथलेटिक्स चॅम्पियनशिपचा रौप्य पदक विजेता योगेशने टोकियोमध्ये स्पर्धेची सुरुवात थोडी निराशाजनक राहिली होती. त्याचे पहिले, तिसरे आणि चौथे प्रयत्न अयशस्वी झाले, तर दुसऱ्या आणि पाचव्या प्रयत्नात त्याने अनुक्रमे 42.84 आणि 43.55 मीटर थाळी फेकली. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे हे तिसरे रौप्यपदक आहे.
रविवारी(२९ ऑगस्ट) महिला टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल आणि ऍथलिट निषाद कुमार (उंच उडी) यांनी रौप्य पदक जिंकले, तर विनोद कुमारने थाळीफेक एफ 52 स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.
योगेशची आंतरराष्ट्रीय कारकीर्द साधारण 2018 पासून सुरु झाली होती. आशियाई क्रिडा स्पर्धेत योगेशने जबरदस्त कामगिरी केली होती. त्या स्पर्धेत त्याने चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर बर्लिनमध्ये पॅराऍथलिट ग्रांप्रीमध्ये योगेशने थाळीफेकीच्या F36 प्रकारात 45.18 मीटर थाळीफेक करुन वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं. टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये योगेश पहिल्यांदाच खेळत होता, पहिल्याच प्रयत्नात त्याने हे रौप्य पदक पटकावलं आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगेश कठुनिया याचे रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आणि म्हटले आहे की त्यांचे हे अभुतपुर्व यश नवोदित खेळाडूंना प्रेरणा देईल.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! भारताकडून ४ धावांत ६ विकेट्स घेणारा स्टुअर्ट बिन्नी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात फेरबदल; बटलरची उर्वरित मालिकेतून माघार, तर ‘या’ गोलंदाजांचे पुनरागमन
इतिहास घडला! भारताच्या अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये जिंकले ‘सुवर्णपदक’






