मुंबई:-सिद्धीप्रभा फाऊंडेशन, विजय क्लब, शिवमुद्रा प्रतिष्ठान, एस.एस.जी. फाऊंडेशन यांनी यंग भारत सेवा मंडळाने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. अंकुरचा अमन मण्यार आजच्या दिवसाचा मानकरी ठरला. सिद्धीप्रभा विरिद्ध विजय क्लब, तर शिवमुद्रा विरुद्ध एस.एस. जी. अशा उपांत्य लढती होतील. प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी मनोरंजन मैदानातील राष्ट्रीय कबड्डी खेळाडू स्व. गोपीनाथ जाधव क्रीडांगणावर झालेल्या तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सामन्यात सिद्धीप्रभाने आपल्याच शेजारील विकास मंडळाचा ६९-२० असा सहज धुव्वा उडविला. पहिल्या सत्रात २लोण देत सिद्धीप्रभाने ३४-१४ अशी भक्कम आघाडी घेतली.
दुसऱ्या सत्रात आणखी २लोण देत गुणांचे अर्धशतक पार करीत साठी गाठली. सिद्धीप्रभाच्या विजयात कुणाल बागवेने एकाच चढाईत ५गडी टिपत आक्रमणाची बाजू मजबूत सांभाळली. त्याला चढाईत सिद्धेश भोसलेची, तर पकडीत रोशन झोरेची उत्तम साथ लाभली. विकासचा गोविंद नरु बरा खेळला.
विजय क्लबने अत्यंत चुरशीच्या लढतीत गोलफादेवीचे आव्हान ३४-२७ असे संपविले. पूर्वार्धात १४-१९अशा पिछाडीवर पडलेल्या विजयने उत्तरार्धात लोण देत २६-२२अशी आघाडी घेतली. शेवटी संयमी खेळ करीत ०७गुणांनी बाजी मारली. रोहन तिवारी, मनीष वासकर, आरिफ शेख यांना उत्तरार्धात सुर सापडल्याने त्यांना विजयाची किमया साधता आली. गोलफादेवीच्या आलोक गायकवाडने एका चढाईत ४गडी टिपत सामन्यात रंगत आणली. त्याला ओमप्रकाश पासवानने पूर्वार्धात छान साथ दिली. पण संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. शिवमुद्रा प्रतिष्ठानने अंकुर स्पोर्टस् चा ४५-२८ असा सहज पाडाव केला. अर्णव हातकर, विशाल लाड, विवेक पवार यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अंकुरच्या सौरभ शेलार, अमन मण्यार, दिपेश जोशी यांचा प्रतिकार दुबळा ठरला.
शेवटच्या सामन्यात एस.एस.जी. फाउंडेशनने श्रीराम मंडळ विश्वस्तचा ३८-३० असा पराभव केला. आक्रमक सुरुवात करीत एस.एस.जी.ने भक्कम बचावाच्या जोरावर मध्यांतराला १७-१० अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर मात्र श्रीराम कडवा प्रतिकार केला. पण पहिल्या डावातील आघाडी त्यांना भरून काढता आली नाही. दिनेश गवळीच्या चढाया त्याला जितेंद्र व शासवल या यादव बंधूंची मिळालेली पकडीची भक्कम साथ त्यामुळे एस.एस.जी.ने विजय साकारला. श्रीरामच्या निखिल गोजारे, हर्ष काळे, अंकुश पारले यांनी शर्थीची लढत दिली.