पुणे: एटीपी टूर 250 वर्ल्ड मालिकेतील टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे मुख्य फेरीचे ड्रॉ एका शानदार समारंभात आज जाहीर करण्यात आले. मेरिन सिलीच, रोबर्टो बोटिस्टा ऑगट, बेनॉय पायरे, आणि केविन अँड्रीसंन या अव्वल मानांकित खेळाडूंना पहिल्या फेरीत बाय देण्यात आला असून भारताचा अव्वल खेळाडू युकी भांब्री समोर सलामीच्या फेरीत पुण्याचा युवा खेळाडू अर्जुन कढेचे आव्हान असणार आहे.
या समारंभाला भारताचे महान टेनिस पटू विजय अमृतराज, एटीपीचे स्पर्धा संचालक टॉम ऍनियर, एटीपी टूर मॅनेजर अर्नो बृजेस, एटीपी निरीक्षक मायरो ब्रटोएव्ह, स्पर्धा संचालक प्रशांत सुतार, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, फ्रांसचा टेनिस पटू बेनॉय पायरे, भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस व युकी भांब्री उपस्थित होते.
मुख्य स्पर्धेच्या ड्रॉ नुसार अग्रमानांकित मेरिन सिलीच आणि गतविजेता रोबर्टो बोटिस्टा यांना पहिल्या फेरीचा बाय मिळाला असून थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला आहे. युकी भांब्री व अर्जुन कढे हि पहिल्या फेरीची लढत प्रेक्षकांचे खास आकर्षण ठरणार आहे. युकी भांब्री जागतिक क्रमवारीत 116व्या क्रमांकावर असून या स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.
युकी भांब्री यावेळी म्हणाला कि, पुण्यासारख्या ठिकाणी हि स्पर्धा आयोजित करण्यात येणे महत्वाचे ठरणार असून मी या स्पर्धेत सहभागी व खेळण्यास उत्सुक आहे. आम्हा दोघांनाही एकमेकांचा खेळ माहित असल्यामुळे अर्जुनविरुद्ध च्या लढतीसाठी मी प्रतीक्षा करीत आहे.
यावेळी लिएंडर पेस म्हणाला कि, मी जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा सर्व्ह आणि व्हॉली शैलीचा खेळ होता. त्यानंतर सर्व्ह आणि रिटर्न पद्धतीचा खेळ सुरु झाला. पण आता त्यात अजून बदल झाला आपले कौशल्य व चतुराईने खेळ करण्याकडे अधिक भर दिला जात आहे. दुहेरीत खेळाडू दीर्घकाळ एका साथीदार सोबत खेळत असे, पण आता ग्रँड स्लॅम जिंकल्यानंतर देखील आपला साथीदार बदलताना दिसतात. याचे कारण त्यांना एकेरीतील यश अधिक महत्व वाटत. त्याचबरोबर दुहेरीत यश मिळविण्याकरिता त्यांच्या शैलीला साजेशा साथीदार असतो व तो त्यांना हवा असतो.
भारताच्या या स्पर्धेतील आशा 23वर्षीय रामकुमार रामनाथनवर अवलंबून आहेत. रामकुमारसमोर पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत 166व्या क्रमांकाच्या रोबर्टो बायेणाचे खडतर आव्हान आहे. अन्य महत्वाच्या लढतींमध्ये जागतिक क्रमवारीत 42व्या रॉबिन ह्यासे, स्लोव्हेनियाच्या ब्लेज कावकीकशी झुंज देणार आहे. तसेच फ्रान्सच्या किमॉन जाईलसमोर अमेरिकेच्या स्टेनिस सँडग्रेन्स कडवे आव्हान असणार आहे.