सध्या भारताचे दोन क्रिकेट संघ विविध देशांमध्ये खेळत आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ खेळाडूंचा एक संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी पोहोचला आहे तर, शिखर धवनच्या नेतृत्वात आणखी एक संघ श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळेल. याचवेळी भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग याने भारताचा पुढील कर्णधार कोण असावा याविषयी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
हा असावा भारताचा पुढील कर्णधार
भारतीय क्रिकेट संघाला दोन विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक बाबींवर दिलखुलास चर्चा केली.
भारताच्या आगामी कर्णधाराविषयी बोलताना तो म्हणाला, “मला यष्टीरक्षक रिषभ पंत भारताचा पुढील कर्णधार वाटतो. तो अत्यंत उत्कृष्टरित्या देशाचे नेतृत्व करू शकतो. त्याच्याकडे ही क्षमता नक्कीच आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे त्याने ज्याप्रकारे नेतृत्व केले, त्यावरून लोकही त्याला भारताचा पुढील कर्णधार म्हणून पाहत आहेत.”
युवराजने पुढे बोलताना म्हटले, “रिषभकडे पाहून मला ऍडम गिलख्रिस्ट आठवतो. गिलख्रिस्ट ज्याप्रकारे ताबडतोब फलंदाजी करत सामन्याचा निकाल पाठवू शकत होता, तशी क्षमता रिषभकडे आहे. तो एक उत्कृष्ट यष्टीरक्षक व मधल्या फळीतील उत्तम फलंदाज असून, याच बाबी त्याला इतरांपेक्षा वेगळ्या बनवतात.”
युवराजने या मुलाखतीत आपल्या कारकीर्दीतील काही आठवणींना देखील उजाळा दिला.
इंग्लंडमध्ये आहे रिषभ
रिषभ पंत सध्या वरिष्ठ संघासह कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर तो इतर संघासह इंग्लंडमध्ये सुट्ट्या घालवतोय. युरोपात सुरु असलेल्या युरो कपमधील इंग्लंड विरुद्ध जर्मनी हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना त्याने मैदानात जाऊन पाहिला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होईल. पहिला सामना नॉटिंघम येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीने गांगुलीला दिल्या ‘डबल’ शुभेच्छा, शानदार खेळीचा व्हिडिओ केला पोस्ट
ले पंगा! बांगलादेश-झिम्बाबेचे क्रिकेटपटू भिडले चालू सामन्यात, व्हिडिओ होतोय व्हायरल





