एकदिवसीय आणि टी-20 क्रिडा प्रकारात भारतीय संघातील सर्वात आक्रमक आणि यशस्वी क्रिकेटपटू म्हणून युवराज सिंगचे नाव घेतले जाते. 2007 सालचा टी-20 विश्वचषक आणि 2011 सालचा एकदिवसीय विश्वचषक भारताने आपल्या नावावर केला. या दोन्ही मालिकांमध्ये युवराजची कामगिरी नेत्रदीपक अशी राहिलेली आहे.
“आपल्या 18 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत युवराज सिंगने अनेकदा एकट्याच्या जीवावर भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याचे हे योगदान कधीही नजरेआड करता येणारे नाही. “
‘कमबॅक किंग’ या नावाने ओळखला जाणारा युवराज सिंग आता 37 वर्षांचा होत आहे. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करुन मैदानावर परतणारा युवराज जसा प्रेक्षकांनी पाहिलाय, तसाच पुन्हा एकदा त्याला वेगवेगळ्या लीग क्रिकेटमध्ये मैदानावर खेळताना पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
आज या लेखात आम्ही महास्पोर्टसच्या प्रेक्षकांना आणि युवराज सिंगच्या चाहत्यांना त्याच्या किक्रेट कारकिर्दीतील अशा 10 महत्वपुर्ण आणि अविस्मरणीय खेळ्या दाखवणार आहोत, ज्या त्याच्या आयुष्यातील मौल्यवान क्षणांपैकी एक आहेत. चला तर पाहुयात ‘षटकारांचा बादशाह’ असलेल्या युवराज सिंगच्या ‘त्या’ दहा अप्रतिम खेळ्या…
क्रमांक – 10
- 139 धावा, विरुद्ध संघ ऑस्ट्रेलिया (सिडनी 2003)
2003 साली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी सिडनी येथे झालेल्या सामन्यात युवराजने अफलातून कामगिरी केली होती. त्या सामन्यात खरेतर भारत 80 धावांवर 3 बाद, अशा बिकट अवस्थेत होता. मात्र, युवराजने मैदानावर उतरल्यानंतर सामन्याचे सर्व चित्र बदलून टाकले. युवीने चौफेर फटकेबाजी करत व्हीव्हीएस लक्ष्मणच्या साथीने 213 धावांची भागीदारी केली आणि भारताला एका सुस्थितीत नेले होते.
या सामन्यात युवराजने तब्बल 139 धावा कुटल्या होत्या. त्यात 16 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. मात्र, युवराजच्या त्या वादळी खेळीनंतरही भारताने तो सामना गमावला होता. तरिही युवराजला त्या सामन्यात ‘सामनावीर’ पुरस्कार मिळाला होता.
क्रमांक – 9
- 113 धावा, विरुद्ध संघ वेस्ट इंडीज (चेन्नई 2011)
2011 सालच्या एकदिवसीय विश्वचषकाचा भारत हा यजमान देश होता. या मालिकेत वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात युवराजने केलेले शतक आजही क्रिकेट रसिकांच्या चांगलेच आठवणीत आहे. त्या सामन्यात भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करताना चांगलाच अडखळला होता. मात्र, चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या युवराजने मैदानावर आल्यानंतर सगळी सुत्रे आपल्या हाती घेतली.
त्या सामन्यात युवराजने 123 चेंडूमध्ये 113 धावांची उपयुक्त खेळी केली होती. युवराजच्या 113 धावांमुळेच भारतीय संघ वेस्ट इंडीज संघापुढे पर्याप्त आव्हान उभे करु शकला. युवराजच्या 113 धावांमध्ये 10 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तसेच युवीने गोलंदाजीतही आपली कमाल दाखवत 2 बळी टिपले होते. भारताने हा सामना त्यामुळे आरामात आपल्या खिशात टाकला होता.
वेस्ट इंडीज विरुद्धच्या त्या सामन्यातील युवराज सिंगच्या अष्टपैलू खेळीसाठी त्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले होते.
क्रमांक – 8
- 60 धावा आणि 23 धावांच्या मोबदल्यात 3 बळी, विरुद्ध संघ श्रीलंका (मोहाली 2009)
2009 साली श्रीलंकेविरुद्धचा टी-20 चा एक थरारक सामना आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यातही त्या सामन्यातील युवराज सिंग प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिलेला आहे.
दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अंतिम सामन्यात युवराज सिंगच्या अष्टपैलू खेळी केली. युवीच्या त्या खेळीच्या जोरावर भारताने मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती. “घरच्या मैदानावर झालेला हा सामना युवराजने स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी अधिकच संस्मरणीय केला होता.”
युवराजने त्या सामन्यात सर्वप्रथम 23 धावांच्या मोबदल्यात 3 बळी आपल्या नावावर केले होते. त्यानंतर भारताकडून फलंदाजीला उतरलेल्या युवराजने 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 60 धावा केल्या होत्या. युवराजच्या त्या अफलातून कामगिरीमुळेच भारताने सामना जिंकत मालिकेत बरोबरी केली होती.
युवराज सिंगला सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले होते.
क्रमांक – 7
- 84 धावा, विरुद्ध संघ ऑस्ट्रेलिया (नॉकआऊट चषक 2000)
युवराज सिंगने 2000 साली नॉकआऊट चषक खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या मालिकेत युवराजने दुसऱ्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध धुवांधार फलंदाजी केली. तसेच ती त्याच्या कारकिर्दीतील पहिली सर्वोत्कृष्ट खेळी होती.
युवराज सिंगने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य पुर्व सामन्यात 80 चेंडूंचा सामना करताना 84 धावा केल्या होत्या. या खेळीत युवीने तब्बल 12 चौकार लगावले होते. या सामन्यानंतर तो पहिल्यांदाच ‘सामनावीर’ झाला होता.
क्रमांक – 6
- 69 धावा, विरुद्ध संघ इंग्लंड (नेटवेस्ट चषक अंतिम सामना 2002)
2002 साली इंग्लंडमध्ये झालेल्या नेटवेस्ट चषक मालिकेत युवराज भारतीय संघातील प्रमुख अकरा खेळांडूमध्ये सामील होता. इंग्लंड विरुद्धचा हा सामना तसा संपूर्ण भारतीय संघासाठीच संस्मरणीय आहे. त्याहून विशेष युवराजसाठी, याचे कारण त्या सामन्यात युवराजनेच आपल्या खेळीने भारताला परजयाच्या वाटेहून परतवत विजयाकडे नेले होते.
त्या सामन्यात युवराज सिंगने मोहम्मद कैफच्या साथीने 121 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली होती. ज्याच्या जोरावर भारताने हा अंतिम सामना आपल्या खिशात टाकला होता. “या विजयानंतर कर्णधार सौरव गांगुलीने आपला टी-शर्ट काढून भिरकावल्याचा क्षण आजही क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांसमोर आहे.”
युवराजने या सामन्यात 63 चेंडूत 69 धावा केल्या होत्या. ज्यात 9 चौकार आणि एक खणखणीत षटकार समाविष्ट आहे.
क्रमांक – 5
- 107 धावा, विरुद्ध संघ पाकिस्तान (कराची 2006)
2006 साली भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. हा संपुर्ण दौरा युवराज सिंगच्या अफलातून कामगिरीने क्रिकेट रसिकांच्या चांगलाच स्मरणात राहिला आहे. यातील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाच्या महेंद्र सिंग धोनी आणि युवराज सिंग या जोडीने संघाला अनेकदा पराजयाच्या गर्तेतून बाहेर काढले होते.
त्यापैकी कराची येथे झालेला सामना मात्र प्रचंड चर्चेत राहिला. या सामन्यात युवराजने दमदार फलंदाजी करत नाबाद 107 धावा केल्या होत्या. ज्यात 14 चौकार लगावत त्याने चेंडूला अनेकदा सीमा रेषेपार पाठवले होते. या सामन्यानंतर युवराज ‘सामनावीर’ आणि ‘मालिकावीर’ अशा दोन्ही पुरस्काराचा मानकरी झाला होता.
क्रमांक – 4
- 150 धावा, विरुद्ध संघ इंग्लंड (कटक 2017)
कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करत युवराजने 2017 साली एकदिवसीय संघात जोरदार पुनरागमन केले होते. “इंग्लंड संघाविरुद्ध कटक येथे झालेल्या सामन्यात युवराजने आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी केली होती.” तसेच महेंद्र सिंग सोबत महत्वपूर्ण भागीदारी करत संघाची धावसंख्या 300 च्या पार नेली होती.
इंग्लंड विरुद्धच्या त्या सामन्यात युवराज सिंगने तब्बल 21 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 150 धावा केल्या होत्या. त्याच्या या दमदार शतकाबद्दल त्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले होते.
क्रमांक – 3
- 58 धावा, विरुद्ध संघ इंग्लंड (टी-20 विश्वचषक 2007)
पहिला टी-20 विश्वचषक विजेता संघ म्हणून 2007 चे सर्वच सामने भारतीयासांठी अविस्मरणीय आहेत. परंतु, त्यातही एकूण विश्वचषक मालिकेत युवराज सिंगने केलेली कामगिरी अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. विशेष म्हणजे इंग्लंड संघाविरुद्धच्या सामन्यात युवराजने केलेली विक्रमी खेळी आजही क्रिकेट रसिकांच्या मनात घर करुन आहे.
“इंग्लंड संघातील गोलंदाज स्टुअर्ड ब्रॉड च्या एका षटकात लागोपाट सहाही चेंडूवर सहा खणखणीत षटकार खेचत युवराजने १२ चेंडूतच अर्धशतक साकारले होते.”
या सामन्यात युवराजने तब्बल 58 धावा केल्या होत्या. युवराजच्या या खेळीच्या जोरावर भारताने 200 पेक्षा अधिक धावांचा डोंगर उभा केला होता. तसेच हा सामना भारताने पुढे जिंकलाही होता. सामन्यातील त्या ऐतिहासिक खेळीबद्दल युवराजला तेव्हा ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले होते.
क्रमांक – 2
- 70 धावा, विरुद्ध संघ ऑस्ट्रेलिया (टी-20 विश्वचषक 2007)
2007 या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे कडवे आवाहन होते. मात्र, युवराज सिंगच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला चितपट करत अंतिम सामन्यात धडक दिली होती.
या सामन्यात भारतीय संघ ८ षटकांनंतर 2 विकेट गमावून 41 धावांवर अडखळला होता. त्यावेळी युवराजने मैदानावर पाऊल ठेवले आणि सामन्याचे सगळे चित्र पालटून टाकले. युवीने त्या सामन्याच 30 चेंडूत तब्बल 70 धावांची दमदार फलंदाजी केली होती. यात एकूण 5 चौकार आणि 5 खणखणीत षटकारांचा समावेश होता. युवराजच्या या भन्नाट खेळीनंतर भारताने हा सामना सहज आपल्या खिशात टाकला होता.
क्रमांक – 1
57 धावा आणि 44 धावांच्या मोबदल्यात 2 बळी, विरुद्ध संघ ऑस्ट्रेलिया (2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा)
सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारा क्षण म्हणजे 2011 एकदिवसीय विश्वचषक भारतीय संघाने आपल्या नावावर करणे. मात्र, भारताचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास तितका सोपा नव्हता. तो सोपा करण्यात संपुर्ण मालिकेत ज्या खेळाडूने महत्वपूर्ण योगदान दिले होते, तो खेळाडू म्हणजे युवराज सिंग होय. त्यातही उपांत्य पुर्व सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात युवराजने केलेली खेळी आजही सर्वांच्या आठवणीत आहे.
घरच्या मैदानावर होत असेलेला त्या सामन्यात अगोदरच भारतीय संघ मोठ्या दबावाखाली खेळत होता. तत्पुर्वी प्रथम गोलंदाजी करत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 260 धावांवर रोखले होते. त्यावेळी गोंलंदाजी करत युवराज सिंहने 2 बळी टिपले होते.
यानंतर फलंदाजी करत असताना मात्र भारतीय संघाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली होती. एकवेळ सामना भारताच्या हातातून जाईल की काय, अशी स्थिती होती. अशावेळी सुरेश रैनाच्या साथीने युवराज सिंगने संघाची बाजू सावरली आणि पराजयाच्या छायेतून संघाला बाहेर काढत विजयी केले होते.
युवराज सिंगने त्या सामन्यात रैनासोबत 73 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली होती. ज्यात एकट्या युवराजचे 57 धावांचे योगदान होते. त्यानंतर भारताने तो सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यातील युवीच्या योगदानाबद्दल त्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले होते.
युवीच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील एक खास बाब :
“बंगळुर येथे पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात युवराज सिंगने आपल्या फलंदाजीने पाकिस्तानी गोलंदाजांची तेव्हा चांगलीच दमछाक केली होती. 2007 साली झालेल्या त्या सामन्यात युवराज सिंहने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 169 ही सर्वोत्तम धावसंख्या केली होती.”