माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग नुकताच मोठ्या अडचणीत सापडला आहे. गतवर्षी अप्रत्यक्षपणे दलित समाजातील लोकांवर त्याने अभद्र आणि अपमानास्पद शब्दात टीका केली होती. पेशाने वकील व राष्ट्रीय आघाडी आणि दलित ह्यूमन राइट्सचे संयोजक असलेले रजत कलसन यांनी त्यावेळी युवराज विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुमारे ८ महिन्यांनंतर या प्रकरणाचा मुद्दा पुढे आला असून त्याच्यावर एससी-एसटी कायद्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुरुवारी (२५ फेब्रुवारी) चंदीगडमध्ये सुनावणी होणार आहे.
काही दिवसांपुर्वी या प्रकरणी हरियाणाच्या हांसी पोलिस ठाण्यात कठोर कलमांखाली युवराजविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले होते. आयपीसीच्या कलम १५३, १५३ अ, २९५, ५०५ तसेच एससी/एसटी कायद्याचा कलम ३ {(१)(r) आणि ३(१)(s)} अंतर्गत ही एफआयआर नोंदवण्यात आली होती.
त्यामुळे युवराजवर अटकेची टांगती तलवार लटकत होती. यातून स्वत:ला वाचण्यासाठी युवराजने सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहे. असे असले तरीही, वकील रजत आपल्या निर्णयावर ठाम राहत युवराजला अटक करण्यात येण्याासाठी आपली बाजू मांडताना दिसतील.
नक्की काय घडले होते?
झाले होते असे की, गतवर्षी जून महिन्यात युवराज भारतीय सलामीवीर रोहित शर्मासोबत इंस्टाग्रावर लाइव्ह चॅट करत होता. यादरम्यान बोलताना युवराजने जातिवाचक शब्दांचा वापर केला. तो म्हणाला की, ‘कुलदीप यादव सुद्धा ऑनलाइन आला आहे.’ यावर रोहित म्हणाला की, ‘हो. कुलदीप, युझवेंद्र चहल हे सगळेच ऑनलाइन आहेत, ते नुसते रिकामे बसलेले आहेत.’ तेवढ्यात रोहितला अडवत युवराज म्हणाला की, ‘या भंगी लोकांना काही काम नाही. युझीला (चहल) पाहा. कसला फोटो टाकला आहे त्याने त्याच्या कुंटुंबासोबतचा. मी त्याला एवढेच म्हणालो की, तू तुझ्या बापाला नाचवत आहेस. तू वेडा तर नाहीस ना, XXX’
युवराजच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली होती. अगदी त्यावेळी ट्विटरवर ‘#युवराज_सिंह_माफी_मांगो’ हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. यामुळे शेवटी युवराजला चहलची क्षणा मागावी लागली होती. या घटनेदरम्यान वकील कलसन यांनी हरियाणाच्या हांसी पोलिस अधिक्षकांपुढे युवराजविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच त्याला अटक करण्याची मागणी केली होती.
परंतु पोलिसांनी त्यांच्या तक्रारीला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. अखेर कोर्टाकडून संमती मिळाल्याने हरियाणा पोलिसांनी युवराजविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्माची फळे भोगावी लागणारचं! एका वर्षापुर्वीच्या ‘त्या’ कृत्यासाठी युवराज सिंग विरोधात ‘एफआयआर’ दाखल
युजवेंद्र चहलबद्दल ‘ती’ टिपण्णी करणे युवराज सिंगला पडले महागात, पाहा काय आहे प्रकरण