काल ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या एकमेव सराव सामन्यासाठी संघाची घोषणा झाली. यावेळी भारतीय संघातून तीनशेहून अधिक सामने खेळणाऱ्या युवराज सिंगला मात्र या अध्यक्षिय ११ संघातून वगळण्यात आले.
याबरोबर गेल्या काही दिवसात घोषणा झालेल्या दुलीप ट्रॉफी, अध्यक्षिय ११ किंवा भारतीय संघात युवराजची निवड झाली नाही. एकूण ७४ खेळाडू हे वेगवेगळ्या स्थरावरील क्रिकेट खेळण्यासाठी निवडले असून या ७४ खेळाडूंमध्ये युवराज सिंगला कुठेही स्थान देण्यात आले नाही.
निवड समितीने श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या संघातील १५ पैकी अनेक खेळाडूंना परत संधी देण्याचे संकेत दिले आहेत. दुलीप ट्रॉफीसाठीही गेल्याच आठवड्यात ४५ खेळाडूंची निवड झाली.तर अध्यक्षीय लढतीसाठी १४ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला असून यातही युवराज सिंगला संधी देण्यात आली नाही. देशातील टॉप ७४ खेळाडूंमध्ये अशा प्रकारे युवराजला स्थान देण्यात आले नाही.
भारतीय संघातील अनुभवी सुरेश रैनालाही दुलीप ट्रॉफीमध्ये संधी देऊन निवड समितीने त्याला पुन्हा संधी देण्याचे संकेत देण्यात आले आहे. अन्य अनुभवी खेळाडूंमध्ये पार्थिव पटेल, दिनेश कार्तिक, मनोज तिवारी आणि इशांत शर्मा या खेळाडूंनाही संधी देण्यात आली.
याबरोबर निवड समितीने युवराजला पुन्हा संघात स्थान न देण्याचे किंवा २०१९ विश्वचषकासाठी विचार न करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.