बंगळूरु। विजय हजारे ट्रॉफी 2018 मध्ये आज पंजाब विरुद्ध रेल्वे संघात सामना सुरु आहे. या सामन्यात पंजाबचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे शतक थोडक्यात हुकले आहे.
या सामन्यात पंजाबचा कर्णधार मनदीप सिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबची सुरुवात समाधानकारक झाली होती. पण त्यांचा सलामीवीर फलंदाज मनन व्होराने(13) स्वस्तात विकेट गमावली.
मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि युवराजने पंजाबचा डाव सांभाळला. पण गिल 53 धावांची अर्धशतकी खेळी करुन बाद झाला. यानंतर लगेचच कर्णधार मनदीपनेही(3) विकेट गमावली.
यानंतर मात्र युवराज आणि गुरकिरत सिंग मनने भक्कम भागीदारी करत पंजाबला 240 धावांचा टप्पा गाठून दिला. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 144 धावांची भागीदारी रचली.
ही भागीदारी तोडण्यात रेल्वेच्या चंद्रकांत साकुरेला यश आले. त्याने युवराजला 96 धावांवर असताना बाद केले. त्यामुळे त्याचे शतक 4 धावांनी थोडक्यात हुकले. युवराजने या खेळीत 6 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत.
तसेच गुरकिरतने शतक केले आहे. त्याने 96 चेंडूत 101 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले. त्यालाही साकुरेने बाद केले.
पंजाबने गुरकिरत, गिल आणि युवराजने केलेल्या खेळींच्या जोरावर 50 षटकात 6 बाद 284 धावा केल्या आहेत आणि रेल्वे समोर विजयासाठी 285 धावांंचे आव्हान ठेवले आहे.
युवराज एक वर्षापासून आहे राष्ट्रीय संघाबाहेर:
युवराज मागील जवळजवळ एक वर्षापासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. त्याने भारताकडून शेवटचा सामना विंडिज विरुद्ध जून 2017 मध्ये खेळला आहे.
हा वनडे सामना नॉर्थ साउंडला झाला होता. या सामन्यात भारताने 98 धावांनी विजय मिळवला होता. यात युवराजने 39 धावा केल्या होत्या.
युवराजने कारकिर्दीत आत्तापर्यंत 40 कसोटी सामने खेळले असून यात 1900 धावा आणि 9 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो आत्तापर्यंत 304 वनडे सामने खेळला आहे. यात त्याने 14 शतके आणि 52 अर्धशतकांसह 8701 धावा केल्या आहेत. तर 111 विकेट्स घेतल्या आहेत.
याबरोबरच त्याने खेळलेल्या 58 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 1177 धावा केल्या असून 28 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–…म्हणून करुण नायर म्हणतो; तरी झाली कुठं चूक, माझी मला कळंना!!!
–करुण नायरने करुन दाखवले, विराटलाही मागे टाकले
–या एका निर्णयामुळे बीसीसीआय येणार गोत्यात