भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने १० जून २०१९ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. युवराज हा वनडे आणि टी२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अफलातून कामगिरी करत भारताला मोठ-मोठ्या स्पर्धा जिंकून दिल्या आहेत.
तर एकदा नजर टाकूयात, युवराज संघात असताना भारताने किंवा तो खेळत असलेल्या आयपीएल संघाने जिंकलेल्या सर्व मोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील युवराजच्या कामगिरीवरती Yuvraj Singh Major Tournaments Winner Performance
१९ वर्षांखालील विश्वचषक (२०००)
२००० साली श्रीलंकामध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक झाले होते. यावेळी मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील भारतीय संघाने पहिल्यांदा चषकावर आपले नाव कोरले होते. अंतिम सामन्यात १९ वर्षांखालील भारतीय संघाने १९ वर्षांखालील श्रीलंका संघाला ५६ चेंडू राखून ४ विकेट्सने पराभूत केले होते.
या विश्वचषकात युवराजने ८ सामन्यात ७ डाव खेळत ३३.८३च्या सरासरीने २०३ धावा केल्या होत्या. याच त्याच्या २ अर्धशतकांचा समावेश होता. तर, त्याने ३.३९च्या इकोनॉमी रेट आणि ११.५०च्या गोलंदाजी सरासरीने एकूण १२ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या दमदार कामगिरीने तो मालिकावीर ठरला होता.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (२००२)
सप्टेंबर २००२ला श्रीलंकामध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि श्रीलंकाने संयुक्त रुपात विजय मिळवला होता. कारण, पावसामुळे अंतिम सामना पूर्ण होऊ शकला. म्हणून दोन्ही संघांना संयुक्तपणे विजयी घोषीत करण्यात आले होते.
यावेळी युवराजने संपूर्ण मालिकेत ४ पैकी २ सामन्यात खेळताना ६५ धावा केल्या होत्या. यात त्याच्या दुसऱ्या सामन्यातील ६३ धावांच्या अर्धशतकी खेळीचा समावेश होता. शिवाय युवराजने पहिल्या सामन्यात १ आणि दुसऱ्या सामन्यात ३ असे मिळून एकूण ४ झेल झेलले होते. त्याने २ सामन्यात गोलंदाजी केली मात्र त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.
आयसीसी टी२० विश्वचषक (२००७)
२००७साली दक्षिण आफ्रिकामध्ये झालेल्या पहिल्या टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात आमने सामने आले होते. यावेळी अंतिम सामन्यात भारताने ५ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघाच्या विजयात युवराजचे मोठे योगदान होते. त्याने त्याच्या कामगिरीने भारताला विश्वचषकातील २ सामने जिंकून दिले होते.
यावेळी संपूर्ण विश्वचषकात ५ सामने खेळत युवराजने १९४.७३च्या स्ट्राईक रेटने १४८ धावा केल्या होत्या. यात त्याच्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील १२ चेंडूतील अर्धशतकाचा आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकातील सलग ६ षटकारांचा समावेश होता. शिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरित त्याने ३० चेंडूत ७० धावांची तूफान खेळी केली होती.
आयसीसी विश्वचषक (२०११)
२०११सालच्या विश्वचषकात भारताने श्रीलंकाला अंतिम सामन्यात ४ विकेट्सने पराभूत केले होते. यासह भारताने २८ वर्षांनंतर चषकावर आपले नाव कोरले होते. विश्वचषकातील युवराजच्या प्रदर्शनामुळे तो मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
त्याने ९ सामन्यांपैकी ८ सामन्यात खेळत ९०.५०च्या सरासरीने ३६२ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ४ अर्धशतकांचा आणि एका शतकाचा समावेश होता. शिवाय त्याने १५ विकेट्सही घेतल्या होत्या. यात त्याची सर्वोत्तम कामगिरी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातील होत्या. या सामन्यात त्याने ३१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
आयपीएल (२०१६ आणि २०१९)
युवराज सिंग त्याच्या आयपीएल कारकिर्दीत अनेक संघांचा भाग होता. तो २०१६मध्ये सनराइजर्स हैद्राबाद संघात असाताना त्याचा संघ विजयी ठरला होता. तर, २०१९मधील विजयी मुंबई इंडियन्स संघाचाही तो भाग होता.
२०१६मध्ये सनराईजर्स हेद्राबादकडून १० सामने खेळताना युवराजने १३१.८४च्या सरासरीने २०३ धावा केल्या होत्या. तर, २०१९ला मुंबई इंडियन्स संघाकडून युवराजने फक्त ४ सामने खेळताना एका अर्धशतकासह ९८ धाव केल्या होत्या.
टी१० लीग (२०१९)
युवराज त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत टी१० लीगमध्येही खेळला आहे. तो २०१९मध्ये टी१० लीगच्या मराठा अरेबियन्स संघाचा प्रमुख खेळाडू होता. यावेळी अंतिम सामन्यात डेक्कन ग्लेडिएटर्सला ८ विकेटने पराभूत करत युवराजच्या मराठा अरेबियन्स संघाने विजय मिळवला होता.
युवराजने संपूर्ण लीगमध्ये ५ सामन्यात ४४ धावा केल्या होत्या. यात त्याच्या सर्वाधिक नाबाद २३ धावांचा समावेश होता.
ट्रेंडिंग लेख-
हे आहेत जगातील सध्याचे घडीचे ४ सर्वोत्तम गोलंदाज
एकेवेळी कापायचा क्रिकेट मैदानावरील गवत, आज नावावर आहेत ७१० विकेट्स
एकाच कसोटी सामन्यात १०० व ० धावा करणारे ५ भारतीय खेळाडू