कोलकाता। बुधवारपासून (१६ फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ३ सामन्यांची टी२० मालिका (T20I Series) खेळवली जाणार आहे. ही मालिका कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जोरदार तयारी केलेली आहे. या मालिकेदरम्यान भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याला (Yuzvendra Chahal) मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे.
चहल टाकू शकतो बुमराहला मागे
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेदरम्यान चहलकडे भारताचा सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज (Most T20I Wickets for India) बनण्याची संधी असणार आहे. चहल या मालिकेदरम्यान भारताकडून सर्वाधिक टी२० विकेट्स घेणारा गोलंदाज बनू शकतो, यासाठी त्याला केवळ ३ विकेट्सची गरज आहे. जर त्याने ३ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स या मालिकेदरम्यान घेतल्या तर, तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला मागे टाकून भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल.
सध्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावावर आहे. त्याने ५५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ६६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच या यादीत सध्या दुसऱ्या क्रमांकावर युजवेंद्र चहल असून त्याने ५० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ६४ विकेट्स घेतल्या आहेत. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ६१ विकेट्ससह आर अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाची गोष्ट अशी की, अश्विन आणि बुमराह दोघेही वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नाहीयेत. त्याचमुळे चहलकडे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनण्याची सर्वोत्तम संधी आहे.
अशी होणार आहे टी२० मालिका
भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात होत असलेल्या टी२० मालिकेतील पहिला सामना १६ फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर १८ आणि २० फेब्रुवारीला या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना पार पडेल. या तिन्ही सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरुवात होणार आहे.
असा आहे भारताचा टी२० संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव
महत्त्वाच्या बातम्या –
हा व्हिडिओ पाहून चिन्ना थालाला देखील अश्रू होतील अनावर, पाहा व्हिडिओ
विराट की रोहित, टी२०ची बादशाहत मिळवणार कोण? वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत रंगणार शर्यत