भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आरजे महवश यांच्याबाबत सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. इंस्टाग्रामवर या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याचं समोर आल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांनी असं का केलं, याचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, सोशल मीडियावर दोघांमध्ये काहीतरी वाद झाला असावा, असा दावा केला जात आहे.
चहलचा धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याचं नाव सातत्याने आरजे महवशसोबत जोडलं जात होतं. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. कधी एअरपोर्टवर, तर कधी कार्यक्रमांमध्ये दोघांची एकत्र उपस्थिती पाहायला मिळाल्याने डेटिंगच्या चर्चांना अधिक बळ मिळालं होतं. मात्र, या दोघांनी कधीही आपल्या नात्याबाबत अधिकृत वक्तव्य केले नव्हते.
दरम्यान, या प्रकरणात पुन्हा एकदा चहलची एक्स पत्नी धनश्री वर्मा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी ‘राइज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होताना धनश्रीने चहलवर गंभीर आरोप केले होते. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच चहलच्या वागण्यात बदल झाल्याचं तिने म्हटलं होतं. “साखरपुड्यानंतरच मला त्याच्या वागण्यात फरक जाणवू लागला होता. तरीही मी नात्यावर विश्वास ठेवला. माझी सवय आहे की मी लोकांना खूप संधी देते, पण एक वेळ अशी येते की माणूस थकतो,” असं धनश्रीने सांगितलं होतं. तिने आपल्या नात्यासाठी पूर्ण प्रयत्न केल्याचा दावाही केला होता.
धनश्रीच्या या वक्तव्यावर नंतर युझवेंद्र चहलने प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत चहल म्हणाला होता, “मी एक खेळाडू आहे आणि मी कधीच धोका देत नाही. जर एखादा माणूस दोन महिन्यांतच फसवणूक करत असेल, तर नातं इतकी वर्षं टिकेल का? माझ्यासाठी हा विषय संपला आहे. मी आयुष्यात पुढे गेलो आहे आणि इतरांनीही पुढे जायला हवं.”
दरम्यान, चहल आणि आरजे महवश यांनी एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे त्यांच्या नात्याबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हा वाद खरंच वैयक्तिक आहे की फक्त सोशल मीडिया अफवा, हे येत्या काळात स्पष्ट होईल. तोपर्यंत चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम राहणार आहे.






