युजवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. चहल सध्या राजस्थान रॉयल्सकडून खेळतोय. आज (13 एप्रिल) आयपीएल 2024 च्या 27व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने असतील. मुल्लानपूर येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात युजवेंद्र चहल एक ऐतिहासिक कामगिरी करू शकतो.
पंजाब किंग्जविरुद्ध होणाऱ्या सामन्यात युजवेंद्र चहल बळींचं द्विशतक पूर्ण करू शकतो. चहलनं आतापर्यंत आयपीएलमध्ये 197 विकेट्स घेतल्या आहेत. अशा स्थितीत त्यानं पंजाबविरुद्ध तीन विकेट घेतल्यास तो आयपीएलच्या इतिहासात 200 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरेल.
युजवेंद्र चहलनं 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्यानं या स्पर्धेत 150 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 149 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्यानं 21.26 च्या सरासरीनं 197 बळी घेतले आहेत. या दरम्यान 5/40 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली. चहलनं आयपीएलमध्ये 7.66 च्या इकॉनॉमीनं धावा खर्च केल्या आहेत.
युजवेंद्र चहल हा धावांच्या बाबतीत कंजूस आणि डोक्यानं हुशार गोलंदाज मानला जातो. तो अनेकदा आपल्या फिरकीनं फलंदाजांना चकमा देतो. आयपीएलच्या या हंगामातही चहल तुफान फार्मात आहे. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये 13.20 च्या सरासरीनं 10 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो जसप्रीत बुमराहसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
युजवेंद्र चहल – 197 बळी (150 सामने)
ड्वेन ब्राव्हो – 183 बळी (161 सामने)
पीयूष चावला – 181 बळी (185 सामने)
अमित मिश्रा – 173 बळी (161 सामने)
भुवनेश्वर कुमार – 173 बळी (165 सामने)
आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सनं आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्म दाखवला आहे. संघानं 5 सामने खेळले, ज्यापैकी 4 मध्ये विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. राजस्थाननं आपला एकमेव सामना गुजरात टायटन्सविरुद्धचा 3 गडी राखून हरला होता. त्यापूर्वी त्यांनी सलग पहिले चार सामने जिंकले होते.
पहिल्या सामन्यात राजस्थाननं लखनऊवर 20 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात त्यांनी दिल्लीविरुद्ध 12 धावांनी, तिसऱ्या सामन्यात मुंबईविरुद्ध 6 विकेट्सनं आणि चौथ्या सामन्यात बंगळुरूविरुद्ध 6 विकेट्सनं विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कसलं हे क्रिकेटचं वेड..! मुलीच्या शाळेची फी नाही भरली पण धोनीला पाहायला 64 हजार खर्च केले
विजय दिल्लीचा, पराभव लखनऊचा पण दणका बसला बंगळुरुला! नेमकं काय घडलंय? आरसीबीसाठी यंदाही वाटचाल कठीण