भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया गेल्या काही दिवसांपासून चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सराव करत आहे.
या मालिकेत भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलला स्थान मिळालेलं नाही. चहल सध्या इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवत आहे. चहल काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये नॉर्थम्पटनशायर संघासाठी खेळतोय. त्यानं लेस्टरशायर विरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशी 4 विकेट घेतल्या.
लेस्टरशायर संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चहलनं सर्वात आधी इयान हॉलंडची विकेट घेतली. चहलनं हॉलंडला 12 च्या धावसंख्येवर क्लिन बोल्ड केलं. यानंतर त्यानं रेहान अहमद आणि बेन कॉक्सच्या विकेट घेतल्या. चहलची चौथी विकेट स्टकॉट करीच्या रुपात आली. तो भोपळाही फोडू शकला नाही. अशाप्रकारे चहलनं 23 ओव्हर गोलंदाजी करत एकूण 4 विकेट घेतल्या.
लेस्टरशायरचा पहिला डाव 203 धावांवर समाप्त झाला. प्रत्युत्तरात, पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नॉर्थम्पटनशायर संघानं 3 विकेट गमावून 134 धावा केल्या होत्या. चहलची टीम पहिल्या डावात अजूनही 69 धावांनी मागे आहे.
युझवेंद्र चहलला अद्याप भारतीय कसोटी संघात स्थान मिळालेलं नाही. विशेष म्हणजे, तो भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंची निवड झाली. चहलनं यापूर्वी भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्ती केली होती. आता इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटमध्ये आपल्या शानदार कामगिरीनं चहल भारतीय निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेऊ शकतो का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
हेही वाचा –
विराट कोहलीच्या शब्दांनी आयुष्य बदलले; युवा गोलंदाजाचे लक्षवेधी वक्तव्य
आयपीएल विजेत्या कर्णधारासाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद? हिटमॅनशी खास नाते
भारत-बांग्लादेश कसोटी मालिकेसाठी समालोचकांची यादी जाहीर; अनेक दिग्गजांचा समावेश