गेल्या वर्षी आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा नियम लागू करण्यात आला. या नियमानुसार टीम सामन्यादरम्यान आपल्या एका खेळाडूला बदलू शकते. मात्र आता या नियमावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. क्रिकेट विश्लेषकांच्या मते, या नियमामुळे ऑलराऊंडरची भूमिका कमी झाली आहे.
उदाहरण घ्यायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्ज शिवम दुबेचा उपयोग केवळ पॉवर हिटर म्हणून करते. मात्र दुबे ठीक-ठाक गोलंदाजीही करू शकतो. पण इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे दुबेला गोलंदाजीची संधीच मिळत नाही. चेन्नईची टीम गोलंदाजीच्या वेळी शिवन दुबेच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून एखाद्या स्पेशलिस्ट गोलंदाजाला टीममध्ये आणते. यामुळे अनेक जाणकार या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आता या सर्व चर्चांवर भारताचा दिग्गज खेळाडू जहीर खाननं आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जियो सिनेमावरील कार्यक्रमात बोलताना जहीर खान म्हणाला, “मी या गोष्टीशी पूर्णपणे सहमत आहे की, हा चर्चेचा मुद्दा आहे. हा थोडा चिंतेचा विषय आहे, मात्र आपण यावर तोडगा काढायला हवा.” जहीर खानच्या मते, इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे केवळ कामचलाऊ ऑलराऊंडर तयार होतील.
याशिवाय जहीर खाननं आगामी टी20 विश्वचषकासाठीच्या भारतीय संघाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला की, टी20 विश्वचषकासाठी जसप्रीत बुमराह सोबत मोहम्मद सिराज संघामध्ये असायला हवा. या दोघांशिवाय अर्शदीप सिंगलाही टीममध्ये स्थान मिळायला हवं.
टी20 विश्वचषकासाठी जवळपास दोन आठवड्यानंतर भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. निवडकर्ते अर्शदीप सिंगवर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय खलिल अहमद, मोहसिन खान आणि आवेश खान यांच्यावरही नजरा असतील. येत्या 2 जूनपासून सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं आयोजन वेस्टइंडिज आणि अमेरिकेमध्ये होणार आहे. चालू आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे अनेक खेळाडूंची टीममध्ये निवड होऊ शकते, असं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिमानास्पद ! भारतीय सशस्त्र दलांच्या महिला अधिकाऱ्यांकडून ‘मिशन साहस-एकता’ मोहीम यशस्वीरित्या पूर्ण