सध्या बांगलादेशचा क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. उभय संघातील टी२० मालिका आश्चर्यकारकरित्या झिम्बाब्वे संघाने जिंकली होती. तर शुक्रवारपासून (५ ऑगस्ट) दोन्ही संघातील वनडे मालिकेला सुरुवात झाली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ३०३ धावा केल्यानंतर झिम्बाब्वेने हे लक्ष पार करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यजमान संघाने पाच गड्यांनी हा विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. माजी कर्णधार व अनुभवी अष्टपैलू सिकंदर रझा आणि युवा इनोसंट काया यांनी शानदार शतके झळकावत हे लक्ष पूर्ण करून दिले. सिकंदर यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
झिम्बाब्वेचा नवनियुक्त कर्णधार रेगीस चकाब्वाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अनुभवी तमीम इक्बाल व लिटन दास यांनी बांगलादेशला ११९ धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. तमीमने ६२ तर दासने ८१ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या अनामुल हकने ७३ धावा केल्या. अनुभवी मुशफिकूर रहीमने नाबाद ५२ व महमदुल्लाने नाबाद २० धावा करत बांगलादेशला ३०३ धावांपर्यंत मजल मारून दिली.
झिम्बाब्वे संघासाठी हे आव्हान जवळपास अशक्यप्राय होते. कर्णधार चकाब्वा केवळ २ व मुसकांदा ४ धावांवर बाद झाल्याने यजमान संघाची अवस्था २ बाद ६ अशी नाजूक झाली होती. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इनोसंट कायाने त्यानंतर जबाबदारीने खेळ केला. पाचव्या क्रमांकावर अनुभवी सिकंदर रझा फलंदाजीला आला. चौथ्या गड्यासाठी या जोडीने १९२ धावांची विक्रमी भागीदारी करत संघाला विजयाच्या समीप नेले. इनोसंट कायाने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. तो ११० धावांवर बाद झाला. रझाने अखेरपर्यंत नाबाद राहत १३४ धावांच्या खेळीसह संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
ईशान नको, ऋतुराज नको अन् नको रिषभ! ‘या’ खेळाडूला द्या ओपनिंगला संधी
टी-ट्वेंटी विश्वचषकातील पराभवाचा बदला इंडिया घेणार, खुद्द पाकिस्तानचा खेळाडूच म्हणतोय…
ईशान नको, ऋतुराज नको अन् नको रिषभ! ‘या’ खेळाडूला द्या ओपनिंगला संधी