भारताचे माजी फलंदाज लालचंद राजपूत पुढील महिन्यात झिम्बाब्वे संघासह पाकिस्तान दौरा करु शकतात. राजपूत हे झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक असून झिम्बाब्वे संघ ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान मुल्तान आणि रावळपिंडी येथे ३ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
या मालिकांसाठी पाकिस्तानला जाण्याची परवानगी राजपूत यांना मिळावी यासाठी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांकडे त्यांना व्हिसा देण्याची विनंती केली आहे. याबद्दल बोर्डाचे अध्यक्ष तेवेंग्वा मुकुह्लांनी यांनी माहिती दिली.
द डेली ऑब्झरवरने दिलेल्या वृत्तानुसार तेवेंग्वा म्हणाले, “लालचंद राजपूत हे आमचे प्रशिक्षक आहेत आणि आम्हाला संघासह त्यांना तिकडे पाठवायचे आहेत. आम्ही अधिकाऱ्यांना(पाकिस्तानी अधिकाऱ्यांना) त्याचा प्रवास सुखकर व्हावा अशी विनंती केली आहे.”
तसेच राजपूत म्हणाले, “आपल्या सर्वांसाठी विशेषत: खेळाडूंसाठी ही आनंदाची बातमी आहे की जवळपास ६-७ महिन्यांच्या विश्रांतीनंतर क्रिकेट सामने होत आहेत. आम्ही आधीच शिबिरासाठी २५ क्रिकेटपटूंची नावे अंतिम केली आहेत. हे खेळाडू कठोर प्रशिक्षण सत्रातून जातील.”
तसेच राजपूत म्हणाले, “मी भारतातून हारारेला जाण्यासाठी विमानसेवा सुरु होण्याची वाट पहात आहे. कदाचीत १ ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरु होईल, असे मला सांगण्यात आले आहे. त्यामुळे मी लवकरात लवकर तिकडे जाऊन शिबिरात सहभागी होऊ शकतो. आम्ही २० ऑक्टोबरला पाकिस्तानला जाण्याआधी मला कमीतकमी ३ आठवडे संघाबरोबर घालवता येतील.”
या दौऱ्यादरम्यान झिम्बाब्वेच्या टी२० आणि वनडे संघाचे कर्णधारपद चामु चिभाभाकडे असणार आहे.
राजपूत हे २००७ च्या टी२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे संघव्यवस्थापक होते. त्यावेळी संघाच्या विजयात त्यांचाही महत्त्वाचा वाटा होता.