मुंबई । जागतिक क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू येतात जे एक- दोन सामन्यात चांगली कामगिरी करून संघात दीर्घ काळ खेळू शकतात असे वाटते. पण नव्याचे नऊ दिवस म्हटल्याप्रमाणे हे खेळाडू पुढे मेहनत घेऊनही क्रिकेटमध्ये आपली छाप सोडण्यात अयशस्वी ठरले.
झिम्बाब्वेच्या संघात देखील असाच एक खेळाडू होता ज्याने स्थानिक सामन्यात न खेळता त्याला थेट राष्ट्रीय संघात संधी मिळाली होती. याच खेळाडूने सचिन तेंडुलकर सारख्या महान फलंदाजाला बाद करून शतक करण्यापासून रोखले होते. आज तोच खेळाडू एका शाळेत शिक्षकाची नोकरी करतोय.
झिम्बाब्वेकडून नव्वदच्या दशकात गाय व्हिटल आणि अँडी व्हिटल नावाचे बंधू खेळत होते. यात गाय व्हिटल एक अष्टपैलू खेळाडू होता तर अँडी एक ऑफस्पिनर म्हणून संघात खेळत होता. त्यासोबत मधल्या फळीत फलंदाजीही करायचा. त्याने झिम्बाब्वे संघाकडून 63 एकदिवसीय आणि 10 कसोटी सामने खेळले आहेत. यात कसोटीमध्ये 7 तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 बळी घेतले आहेत.
अँडी हा इंग्लंडच्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होता. येथेच त्याने लँकेशायर या काऊंटी क्लबकडून पदार्पण केले. त्याने ६५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १३४ विकेट्स घेतल्या. यासोबत ९८५ धावाही काढल्या. त्याच्या कामगिरीच्या जोरावर झिम्बाब्वे क्रिकेट संघाने त्याला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सिंगर वर्ल्ड सीरीजसाठी संघात स्थान दिले.
तो जगातला असा एकमेव खेळाडू होता, जो आपल्या देशासाठी प्रथम क्रिकेट श्रेणीचे सामने न खेळता थेट राष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 1996 साली श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीत साली पदार्पण केले. पण त्याने त्याची निवड सार्थ करून दाखवली नाही. त्याला म्हणावे तसे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय सामन्यात करता आले नाही.
याच अँडीने भारताविरुद्ध ४ सप्टेंबर १९९९ रोजी कोका-कोला सिंगापूर चॅलेंजच्या दुसऱ्या सामन्यात सचिन तेंडुलकरला शतक करू दिले नाही. पावसामुळे हा सामना 29 षटकांचा खेळवण्यात आला. होता. त्या सामन्यात सचिनने स्फोटक फलंदाजी करत 71 चेंडूत 85 धावा ठोकल्या. ज्यात तीन षटकार आणि सात चौकार ठोकले होते. अँडीने या सामन्यात सचिन तेंडुलकरला बाद केल्यामुळे त्याला शतक पूर्ण करता आले नाही .
अँडीने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2000 साली खेळला होता. त्यानंतर त्याला राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले नाही. संघातून बाहेर पडलेल्या अँडीने पुन्हा इंग्लंडची वाट धरली. आज तो केंट येथील टॉनब्रिज स्कूलमध्ये नोकरी करतोय. तेथे तो एका शाळेच्या संघाला क्रिकेटचे धडे देतोय आणि त्यासोबतच गणित हा विषय शिकवतो.