---Advertisement---

ZIMvsIND: दुसऱ्या टी 20 सामन्यात अभिषेक शर्माचा विक्रमी स्पेल! भारतीय क्रिकेटच्या खास रेकॉर्डबुकमध्ये एंट्री

On: रविवार, जुलै 26, 2026 10:52 AM
---Advertisement---

झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने शनिवारी (25 जुलै) खेळलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात 90 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने फलंदाजीत निराशा केली असली, तरी त्याने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करत एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे.

अभिषेकने दुसऱ्या टी 20 सामन्यात असा पराक्रम केला, जो 14 वर्षांपूर्वी वीरेंद्र सेहवागने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटी केला होता. तसेच आता अभिषेकने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 3 विकेट्स घेत सर्व भारतीय सलामीवीरांना मागे टाकून टी 20 क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

अभिषेकची प्रभावी गोलंदाजी
हरारेमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारत असा दुसरा टी20 सामना शनिवारी (25 जुलै) खेळला गेला. यामध्ये भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते, मात्र पाहुण्या संघाची सुरूवात अडखळत झाली. अभिषेक 8 (8) धावा करत बाद झाला. सलग दुसऱ्या सामन्यात तो धावा करण्यात अपयशी ठरला आहे, मात्र एका अनोख्या विक्रमीच्या यादीत प्रवेश केला आहे.

अभिषेकने गोलंदाजीत विलक्षण कामगिरी केली. त्याने 2.5 षटकांत 17 धावा देत ब्रॅड इवान्स, न्यूमन न्यामहुरी आणि रिचर्ड एनगारवा यांच्या विकेट्स घेतल्या. ही त्याची टी 20 आंतरराष्ट्रीयमधील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ठरली आहे. याबरोबरच तो टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सलामीवीर म्हणून 3 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.

सर्वोत्तम गोलंदाजीसह अभिषेकचा खास यादीत प्रवेश
अभिषेकची ही कामगिरी आता सर्व फॉरमॅटमधील भारतीय सलामीवीराच्या दोन अविस्मरणीय कामगिरीच्या पंक्तीत जाऊन बसली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विनू मांकड यांनी पाकिस्तानविरुद्ध 8/52 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1991 मध्ये रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5/15 अशी सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे.

भारतीय सलामीवीराची सर्वोत्तम गोलंदाजी
कसोटी – विनू मांकड (8/52 विरुद्ध पाकिस्तान, 1952)
एकदिवसीय – रवी शास्त्री (5/15 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1991)
टी 20 आंतरराष्ट्रीय – अभिषेक शर्मा (3/17 विरुद्ध झिम्बाब्वे, 2026)*

भारतासाठी शेवटी ‘अशी’ कामगिरी वीरेंद्र सेहवागने 14 वर्षांपूर्वी केली होती
वीरेंद्र सेहवागने 2012 मध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॉमनवेल्थ बॅंक ट्राय सिरीज एकदिवसीय सामन्यात 9 षटकांत 43 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ठरली. आता 14 वर्षांनंतर अभिषेकने सलामीवीर म्हणून टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सेहवागच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---