पुणे। स्पर्धात्मक अनुभव अधिकाधिक मिळवित ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायचे माझे स्वप्न आहे. हे स्वप्न मी पुढील वर्षी साकार करीन असा आत्मविश्वास महाराष्ट्राचा जिम्नॅस्ट अरिक डे याने व्यक्त केला.
पुण्यात सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये अरिक याने तीन सुवर्ण व दोन रौप्य अशी एकूण पाच पदके जिंकली आहेत. मालाड येथील नौदलाच्या क्रीडा अकादमीत भगवानलाल बायसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो दररोज सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास सराव करतो. त्याने कोलकाता येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात या खेळाचे बाळकडू घेतले. सहाव्या वषार्पासून त्याने या खेळाच्या करिअरला सुरुवात केली. वीस वर्षीय खेळाडू अरिक याने २०१३ मध्ये झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत आठ सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला होता.
खेलो इंडिया स्पर्धेबाबत तो म्हणाला, ही स्पर्धा आॅलिंपिकसाठी होणाºया निवड चाचणीसाठी महत्त्वाची असल्यामुळे येथे सर्वच तुल्यबळ खेळाडू सहभागी झाले होते. साहजिकच चिवट स्पर्धा पाहावयास मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदक मिळविण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये आहे. परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाची संधी मिळाली तर निश्चित भारतीय खेळाडूंचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.
खेलो इंडिया खूप फायदेशीरच : ओंकार शिंदे
ऑलिंपिकसाठी पात्रता निकष करण्याच्या दृष्टीने खेलो इंडिया महोत्सवातील अनुभव मला खूप फायदेशीर ठरणार आहे, असे महाराष्ट्राचा खेळाडू ओंकार शिंदे याने सांगितले. त्याने जिम्नॅस्टिक्समध्ये एक सुवर्ण, एक रौप्य व एक ब्राँझपदक मिळविले.
ओंकार म्हणाला, अन्य राष्ट्रीय स्पर्धांच्या तुलनेत येथील स्पर्धा खूपच आव्हानात्मक होती. सर्वच अव्वल दर्जाच्या खेळाडूंच्या सहभागामुळे पदक मिळविण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागला. माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे. येथील साधन सुविधा जागतिक दर्जाच्या असल्यामुळे उत्साहपूर्ण वातावरण पाहावयास मिळाले.
ओंकार हा कल्याण येथील आकार जिम्नॅस्टिक्स अकादमीत अभिजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. आॅलिंपिकसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा माझा प्रयत्न राहील. परदेशी प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण मिळाले तर भारताचे खेळाडू ऑलिंपिकमध्ये चमक दाखवू शकतील.