प्रो कबड्डीमध्ये आजपासून पटणा लेग सुरु होत आहे. आज दुसरा सामना यु मुंबा आणि गुजरात फॉरचूनजायन्टस या संघात होणार आहे.या अगोदर या दोन संघाची गुजरात लेगच्या पहिल्या सामन्यात लढत झाली होती. त्या सामन्यात गुजरातने यु मुंबाला हरवले होते.
गुजरातचा संघ झोन ए मध्ये दुसऱ्या स्थनावर आहे. १३ सामन्यात त्यांचे ४६ गुण आहेत. गुजरातने होम लेगमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. होम लेग संपल्यानंतर या संघाला सातत्य राखता आले नाही. मागील तीन सामन्यात दोन पराभव तर एक सामना त्यांनी बरोबरीत सोडवला आहे. या संघाची ताकद यांचे डिफेंडर आहेत. दोन्ही इराणियन कॉर्नर अबोझार मिघानी आणि फझल अत्राचली उत्तम कामगिरी करत आहेत. रिडिंगमध्ये सचिनने सर्वांना प्रभावीत केले असले तरी मागील काही सामन्यात तो अपयशी ठरला आहे. कर्णधार सुकेश हेगडे याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. कर्णधार म्हणून सुकेश उत्तम कामगिरी करत असला तरी एक रेडर म्हणून त्याला पाचव्या मोसमात प्रभावी कामगिरी करता आलेली नाही.
यु मुंबाची गाडी सध्या रूळावर आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला यु मुंबाच्या संघाने अडखळत सुरुवात केली होती. त्यानंतर मागील काही सामन्यात या संघाच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. या संघाचा दुसरा मुख्य रेडर शब्बीर बापू जायबंदी असून देखील या संघावर त्या गोष्टीचा फारसा प्रभाव जाणवत नाही. अनुप कुमार खेळावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाला आहे. काशीलिंग आडके आणि श्रीकांत जाधव रेडींगमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत.
या संघाचा कमकुवत डिफेन्स त्यांची डोकेदुखी ठरत होता. त्यात यु मुंबाने सुधारणा केली आहे. अनुपकुमार स्वतः डिफेन्सची अतिरिक्त जबाबदारी सांभाळतो आहे. सुरिंदर सिंग आणि कुलदीप सिंग संघासाठी डिफेन्समध्ये चोख कामगिरी बजावत आहेत. एकंदरीत यु मुंबाचा संघ उत्तम कामगिरी करत आहे.
दोन्ही संघाला या सामन्यात विजयाची सामान संधी आहे. परंतु मागील काही सामन्यातील यु मुंबाची कामगिरी पाहता विजयाचे झुकते माप यु मुंबाच्या बाजूने असेल. या दोन संघातील मागील सामना पावसामुळे रद्द झाला होता. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाची परतफेड यु मुंबा करते का गुजरातचा संघ पुन्हा विजयी लयीत परततो हे हा सामन्याच्या निकालावरून आपणाला समजेल.