सिडनी। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज (25 नोव्हेंबर) तिसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 165 धावांचे आव्हान ठेवले आहे.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवनने चांगली सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी रचली. पण हे दोघेही लागोपाठच्या षटकात बाद झाले.
रोहितने या सामन्यात 16 चेंडूत 23 धावा करताना 1 चौकार आणि 2 षटकार मारले. याबरोबरच त्याने खास विक्रम केला आहे. रोहितने दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नॅथन कुल्टर नाईलला मारलेला चौकार हा त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 1000 वा चौकार होता.
रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 आणि त्यापेक्षा जास्त चौकार ठोकणारा 13 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने 308 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना हा पराक्रम केला आहे.
रोहितने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 201, वनडेमध्ये 655 आणि कसोटीत 144 चौकार मारले आहेत. असे मिळून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 चौकार मारले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून 1000 आणि त्यापेक्षा जास्त चौकार सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, विराट कोहली, व्हिव्हिएस लक्ष्मण, एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, सुनील गावस्कर, युवराज सिंग, गौतम गंभीर आणि शिखर धवनने मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–कृणाल पंड्या आॅस्ट्रेलियात चमकला, केले हे खास विक्रम
–महिला टी20 विश्वचषक: आॅस्ट्रेलियाच्या महिलांनी कोरले चौथ्यांदा टी20 विश्वचषकावर नाव
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’