मुंबईची 14 वर्षीय इरा जाधव ही 19 वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात त्रिशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. ही उजव्या हाताची फलंदाज 19 फेब्रुवारी रोजी 15 वर्षांची होईल.
रविवारी (12 जानेवारी) बंगळुरू येथे झालेल्या महिला अंडर 19 एकदिवसीय करंडक स्पर्धेत मेघालयविरुद्धच्या सामन्यात इरा जाधवनं शानदार फलंदाजी केली. तिनं 157 चेंडूत नाबाद 346 धावा केल्या. जाधवच्या खेळीच्या जोरावर मुंबईचा संघ 50 षटकांत 563/3 अशी विक्रमी धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला. जाधवनं 220 च्या स्ट्राईक रेटनं 16 षटकार आणि 42 चौकार मारले. इरा जाधव व्यतिरिक्त कर्णधार हर्ले गालानं 79 चेंडूत 116 धावा केल्या. मुंबईच्या फलंदाजांनी या सामन्यात एकूण 17 षटकार आणि 63 चौकार मारले. मेघालयच्या तीन गोलंदाजांनी 100 पेक्षा जास्त धावा दिल्या.
19 वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त चार भारतीय महिला खेळाडूंनी 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सध्याची भारतीय कर्णधार स्मृती मंधाना (नाबाद 224), राघवी बिष्ट (नाबाद 219), जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद 202) आणि सानिका चालके (200) द्विशतक झळकावण्यात यशस्वी झाल्या आहेत. आश्चर्याचं म्हणजे, अलिकडेच झालेल्या महिला प्रीमियर लीग लिलावात इरा जाधव अनसोल्ड राहिली होती. तिच्यावर कोणत्याही संघानं बोली लावली नाही. तिची मूळ किंमत 10 लाख रुपये होती.
या सामन्यात अनेक मोठे रेकॉर्ड बनले. ते रेकॉर्ड पुढीलप्रमाणे आहेत.
(1) इरा जाधव त्रिशतक ठोकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली.
(2) बीसीसीआयनं आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत त्रिशतक झळकावणारी पहिला भारतीय (पुरुष/महिला) फलंदाज
(3) मुंबईनं केलेला 563/3 चा स्कोअर हा भारतीय महिलांच्या स्थानिक संघानं कोणत्याही स्तरावर केलेला सर्वोच्च स्कोअर आहे.
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी बांग्लादेशचा संघ जाहीर, 26 वर्षीय खेळाडूची कर्णधारपदी वर्णी
“भारतीय खेळाडूंना पैशाचं वेड, आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळाला की…”; ऑस्ट्रेलियन खेळाडूची सडकून टीका
वरिष्ठ खेळाडूंची मनमानी चालणार नाही, आढावा बैठकीत बीसीसीआयचा मोठा निर्णय