भारतीय क्रिकेट संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल आज (9 मार्च) त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्याच दिवशी 1985 मध्ये जन्मलेल्या पार्थिवने त्याच्या 18 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक संस्मरणीय डाव खेळले. एव्हढेच नव्हे, तर यष्टीमागेही त्याने उत्तम कागमिरी केली.
आज या लेखाच्या माध्यमातून आपण त्याच्या कारकिर्दीतील 15 खास गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत.
1. पार्थिव कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात युवा यष्टीरक्षक
ऑगस्ट 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध नॉटिंघम येथे झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यातून पार्थिवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्या कसोटीआधी ‘अजय रात्रा’ या खेळाडूला दुखापत झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पार्थिवला संघात स्थान देण्यात आले. त्यावेळी पार्थिवचे वय 17 वर्षे 153 दिवस एवढे होते. 17 वर्षे 300 दिवसांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हानिफ मोहम्मदचा विक्रम मोडून काढत पार्थिव कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात युवा यष्टीरक्षक बनला.
2. भारतीय संघाचा प्रतिनिधी म्हणून दर्शवली उपस्थिती
पदार्पणाच्या दौऱ्यावर लंडन येथे झालेल्या ‘विस्डेन इंडियन क्रिकेटर ऑफ सेंचुरी अवॉर्ड’ मध्ये पार्थिव भारतीय संघाचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होता.
3. पार्थिवचा आदर्श क्रिकेटपटू
आपल्या उत्तम यष्टीरक्षण कौशल्यासाठी ओळखला जाणारा माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ‘ऍडम गिलख्रिस्ट’ हा पार्थिव पटेलचा आदर्श क्रिकेटपटू आहे.
4. दिग्गज क्रिकेटपटू ‘स्टीव्ह वॉ’ला केले स्लेज
सन 2004 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळण्यात आली होती. याअंतर्गत झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पार्थिवने यष्टीरक्षण केले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज ‘स्टीव्ह वॉ’ च्या कारकिर्दीतील तो शेवटचा कसोटी सामना होता.
स्टीव्ह वॉ खेळपट्टीवर फलंदाजी करत असताना यष्टींमागे उभा असलेल्या पार्थिवने त्याला स्लेज करण्याच्या हेतूने टिप्पणी केली. पार्थिव म्हणाला, “क्रिकेटला निरोप देण्याआधी तुझा लोकप्रिय फटका ‘स्लॉग स्वीप’ खेळ.”
पार्थिवच्या टिप्पणीवर स्टीव्ह वॉने भन्नाट प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, “मी 18 वर्षांपूर्वी जेव्हा पदार्पण केले, तेव्हा तू नॅपीमध्ये होता.”
या घटनेनंतर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंनी स्टीव्ह वॉ सारख्या महान फलंदाजाला स्लेज न करण्याबद्दल पार्थिवला समज दिली.
5. सामना रेफ्रीने ठोठावला दंड
सन 2004 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात लाहोर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पार्थिव प्रत्येक चेंडूनंतर सतत आवाहन करत होता. त्यामुळे सायमन टॉफेल आणि स्टीव्ह बकनर या मैदानातील पंचानी सामना रेफ्रीकडे त्याची तक्रार केली. तो असे करताना कॅमेरातही टिपला गेला होता. आयसीसी आचारसंहिता कलम 2.2 चे उल्लंघन केल्यामुळे पार्थिवला सामना शुल्काच्या 60 टक्के दंड ठोठावण्यात आला.
6. डिविलियर्सने पार्थिवबद्दल केला खुलासा
सन 2014 साली, दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, “पार्थिव जगातील सर्वात चिडचिडा क्रिकेटपटू आहे आणि तो सतत बडबड करत असतो.”
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार्थिवसोबत खेळताना आनंद वाटला, असेही डिविलियर्स म्हणाला.
7. युवराज सिंगने केले ट्रोल
अहमदाबाद येथे एका प्रसिद्ध हॉटेलचे नाव ‘हॉनेस्ट’ असे आहे. पार्थिवने ट्वीट करून या हॉटेलची प्रशंसा केली होती. पार्थिवने केलेल्या ट्विटवरून माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग याने त्याच्यावर निशाणा साधला होता.
8. पार्थिवने स्वतःलाच केले ट्रोल
कमी उंचीमुळे बऱ्याच लोकांनी पार्थिवची खिल्ली उडवली. मात्र, पार्थिवने एक फोटो शेअर करत स्वतः च्या उंचीबद्दल टिप्पणी केली. त्याने स्वतःच्या उंचीची तुलना ‘डोसा’ या खाद्यपदार्थाशी केली होती.
Even the dosa is taller thn me…😝😁 pic.twitter.com/2n7oaZcBHJ
— parthiv patel (@parthiv9) November 20, 2015
9. पार्थिवची झाली फजिती
आयसीसी विश्वचषक 2003 मध्ये पार्थिवची भारतीय संघात निवड झाली होती. त्यादरम्यान एक मजेदार किस्सा घडला होता. एमटीव्ही या लोकप्रिय टीव्ही वाहिनीवरील शो ‘एमटीव्ही बकरा’ मधील काही प्रतिनिधींनी त्याची फजिती केली होती.
पार्थिव त्यावेळी मुंबईत होता आणि एका ठिकाणी जाण्यासाठी त्याने कॅबने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कॅब चालकाची प्रकृती ठीक नसल्याने त्याने पार्थिवला गाडी चालवण्यास सांगितले. जेव्हा पार्थिवने गाडी चालवण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला वाहतूक पोलिसांनी पकडले. पोलिसांनी त्याला पुश अप करायला लावले आणि 4000 रुपये दंडही आकारला. एव्हढेच नव्हे, तर भारतीय संघाच्या पराभवाबद्दल पोलिसांनी त्याला चिडवले आणि त्याला ऑटोग्राफसुद्धा मागितला.
त्याची सुटका करण्यास पोलीस तयार झाल्यानंतर, पार्थिव कारमध्ये बसला आणि ड्रायव्हरवर खूप रागावला. ज्या मित्रामार्फत पार्थिवने कॅब बुक केली होती, त्या मित्राला त्याने फोनही केला.
दरम्यान, ड्रायव्हरने त्याला काही औषध घेण्यासाठी केमिस्टच्या दुकानात जाण्याबाबत विचारणाही केली. पार्थिवने नकार देऊन त्याला टॅक्सीजवळ सोडण्यास सांगितले. असो, पार्थिवला काही क्षणानंतर जाणवलं की प्रसिद्ध ‘एमटीव्ही बकरा’ शोमार्फत त्याची फजिती झाली आहे.
10. सन 2008 साली केले पुनरागमन
ऑगस्ट 2008 मध्ये चार वर्षानंतर पार्थिवने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून भारतीय संघात पुनरागमन केले. त्याने दोन्ही डावात फलंदाजी करत अवघ्या 14 धावा केल्या. मात्र, त्यानंतर त्याची कसोटी संघात निवड झाली नाही.
दोन वर्षानंतर, 2010 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळ्ल्या गेलेल्या मालिकेत आंतरराष्ट्रीय वनडे संघात त्याची निवड झाली होती. त्याने त्या मालिकेत सलग दोन अर्धशतकेही ठोकली होती. मात्र, त्यानंतर त्याला चांगला फॉर्म कायम राखता आला नाही आणि अखेर त्याला 2011-12 या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कॉमनवेल्थ बँक मालिकेनंतर वनडे संघातून वगळण्यात आले.
11. तब्बल 8 वर्षांनंतर पुन्हा केले पुनरागमन
सन 2016 साली, भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याला दुखापत झाली. त्यावेळी त्याच्या जागी पार्थिव पटेलला संघात स्थान देण्यात आले. 8 वर्षांनंतर पार्थिवने कसोटी सामन्यात पुनरागमन केले होते. या काळात भारतीय संघाने खेळलेल्या 83 कसोटी सामन्यांना तो मुकला होता.
12. बालपणीच्या मैत्रिणीशी केले लग्न
पार्थिवची बालपणीची मैत्रीण अवनी झवेरीशी 9 मार्च 2008 रोजी विवाह केला. त्याच दिवशी त्याचा 23 वा वाढदिवसदेखील होता. अवनी अहमदाबादमध्ये इंटिरियर डिझायनर आहे. या जोडप्याला ‘वेनिका’ नावाची एक मुलगी आहे.
13. पार्थिवच्या नेतृत्त्वात गुजरातने जिंकला ‘विजय हजारे ट्रॉफी’
सन 2015-16 या हंगामात विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने गुजरात संघाचे नेतृत्त्व केले होते. त्याच्या नेतृत्त्वात गुजरातने अंतिम सामन्यात दिल्लीला पराभूत केले . या सामन्यात शतकी खेळी करत पार्थिवने या विजयात मोलाची कामगिरी बजावली होती.
संपूर्ण स्पर्धेदरम्यान, त्याच्या संघ सहकाऱ्यांनी त्याला चांगलीच साथ दिली. रुजुल भट, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि आरपी सिंग या खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी बजावत गुजरातला जेतेपद मिळवून देण्यास महत्त्वपूर्ण भूमिका पार पडली.
14. पार्थिवच्या कारकिर्दीत सर्वप्रथम घडलेल्या पाच गोष्टी
ईएसपीएन क्रिकइन्फो या क्रीडा वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत पार्थिवने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत सर्वप्रथम घडलेल्या पाच गोष्टींबद्दल खुलासा केला होता.
- जामनगरमधील एका शिबिरात खेळत असताना बाऊंसर चेंडूला पारखण्यात तो अयशस्वी ठरला होता. त्यावेळी तो अवघ्या 14 वर्षांचा होता.
- कोलकाता येथे हरभजन सिंगने फेकलेला दुसरा चेंडू त्याला उमगलाच नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत वेस्ट इंडिजचा ‘रामनरेश सारवान’ हा पार्थिवच्या हातून यष्टीचित होणारा पहिला फलंदाज होता.
- सन 2002 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्याने यष्टीरक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला झेल सोडला. फिरकीपटू अनिल कुंबळेच्या गोलंदाजीवर पार्थिवने इंग्लंडचा माझी दिग्गज फलंदाज नासिर हुसेनचा झेल सोडला होता.
- वयाच्या 14 व्या वर्षी त्याने यष्टीरक्षण करण्यासाठी ग्लोव्हजची खरेदी केली होती. त्याने 700 रुपयात एसजी ब्रँडचे ग्लोव्हज खरेदी केले होते.
- त्याचा आदर्श खेळाडू ऍडम गिलख्रिस्ट याला तो सर्वप्रथम सन 2003 साली भेटला होता. याबद्दल बोलताना पार्थिव म्हणाला की, “सामन्यापूर्वी मी गिलख्रिस्टला यष्टीरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर थोडा वेळ घालवण्याबाबत विचारणा केली होती. भारताने त्या सामन्यात अवघ्या 125 धावा केल्या आणि गिलख्रिस्टने उत्तम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला सहज विजय मिळवून दिला होता. तो माझी विनंती विसरला नव्हता आणि सामन्यानंतर मला शोधत भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आला. आमच्या गप्पांमध्ये झालेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, त्याने मला खेळाचा आनंद घ्यायला सांगितले, कारण एकदा आपण इतर बाबींची चिंता करण्यास सुरुवात केली की आपण यष्टीरक्षणाचा आनंद घेऊ शकत नाही.”
15. पार्थिवने क्रिकेट कारकिर्दीत अनेक संघांचे केले प्रतिनिधित्व
संपूर्ण कारकिर्दीत पार्थिवने अनेक संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये गुजरात, चेन्नई सुपर किंग्ज, कोची टस्कर्स केरला, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स या संघांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त त्याने राजस्थान क्रिकेट असोसिएशन प्रेसिडेंट इलेव्हन, इंडिया ग्रीन आणि भारत या क्रिकेट संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
ट्रेंडिंग लेख-
अरेरे! क्रिकेट जगतावर राज्य करूनही कधीच रणजी ट्रॉफी न जिंकलेले ४ भारतीय दिग्गज
टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यातून विराट होऊ शकतो बाहेर, स्वत:च दिले संकेत
‘चार महिन्यांपासून मुलाचं तोंड नाही पाहिलं’, सामनावीर पुरस्कार पटकावणारा पंड्या भावूक
धडकी भरवणारा क्षण! कार्तिक त्यागीचा चेंडू लागला पुकोवस्कीच्या डोक्याला, अन् पुढे काय झालं पाहाच…