जेव्हाही 1983 विश्वचषक विजयाची चर्चा होते, तेव्हा सर्वप्रथम कपिल देव यांचे नाव घेतले जाते. त्याचबरोबर त्यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात घेतलेला सर विवियन रिचर्ड्स यांचा झेलही सर्वांना आठवतो. त्यांनी घेतलेल्या झेलामुळे त्या सामन्याचे संपूर्ण चित्रच पालटले होते.
भारतीय संघाने वेस्ट इंडिजला पराभूत करत विश्वचषकावर पहिल्यांदा आपले नाव कोरले होते. परंतु त्या विश्वचकात कपिल देव यांच्याबरोबर आणखी एक भारतीय हिरो होता, ज्याला त्याचे श्रेय कधीच मिळाले नाही. ते खेळाडू इतर कोणी नसून भारतीय संघाचे माजी अष्टपैलू आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) आहेत. त्यांनी बुधवारी (19 जुलै) 68व्या वयात पदार्पण केले.
बिन्नी यांचा जन्म 19 जुलै, 1955 रोजी बंगळुरू येथे झाला. डिसेंबर 1980 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय वनडे संघात पदार्पण करणाऱ्या बिन्नी यांनी 1983 च्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ आपले सर्व सराव सामने पराभूत झाला होता आणि त्यावेळी भारतीय संघाला मनोबलाची आवशक्यता होती. अशामध्ये बिन्नी यांच्या गोलंदाजीनेच संघाचा आत्मविश्वास वाढविण्यात भर पाडली होती.
बिन्नी यांचे योगदान इतके महत्त्वाचे होते, की जर बिन्नी नसते, तर भारतीय संघाला विश्वचषक जिंकणे सोडा अंतिम सामन्यातही पोहोचता आले नसते. कारण बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 षटकात 29 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या तसेच ऑस्ट्रेलियाला पराभव स्विकारण्यास भाग पाडले होते. त्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 60 षटकात 247 धावा केल्या होत्या. परंतु बिन्नीच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 129 धावांवर संपुष्टात आला होता.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामनाही भारतीय संघाने 6 विकेट्सने जिंकला होता. त्यामध्ये बिन्नी यांनी 2 विकेट्स घेतल्या होत्या. आता अंतिम सामन्यात भारतीय संघ बलाढ्य वेस्ट इंडिजला टक्कर देणार होता. ज्याने 2 वेळा विश्वचषक आपल्या नावावर केला होता. वेस्ट इंडिजला पराभूत करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. कारण त्यावेळी संघात सर रिचर्ड्स यांच्याव्यतिरिक्त क्लाईव्ह लॉयड, डेसमंड हेन्स आणि गार्डन ग्रीनिज यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता.
भारतीय संघाची सुरुवात फार काही चांगली झाली नव्हती. ते पाहून असे वाटत होते की आता वेस्ट इंडिज संघ पुन्हा एकदा विश्वचषकावर आपले नाव कोरते की काय. नियमित अंतराने विकेट्स गमावत भारतीय संघाचा डाव 183वर संपुष्टात आला होता.
मात्र, 183 ही धावसंख्या वेस्ट इंडिज संघासाठी फार काही मोठी धावसंख्या नव्हती. परंतु भारतीय संघाच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना पुरता घाम फोडला. अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या विजयात बिन्नी यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. बिन्नी यांनी अंतिम सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 23 धावा देत 1 विकेटही घेतली. भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणासमोर वेस्ट इंडिज संघाने आपले गुडघे टेकले होते. वेस्ट इंडिजचा डाव केवळ 140 धावांवर संपुष्टात आला होता. अशाप्रकारे भारतीय संघाने इतिहास रचत पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. या विजयाबरोबरच तत्कालीन कर्णधार कपिल देव (Kapil Dev) संपूर्ण देशासाठी हिरो बनले होते, तर बिन्नी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी श्रेयही मिळाले नाही.
बिन्नी (Roger Binny) यांनी भारतीय संघाकडून 27 कसोटी आणि 72 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी कसोटीत 32.63 च्या सरासरीने 47 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर वनडेत त्यांनी 29.35च्या सरासरीने 77 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला विश्वचषक जिंकून देणारे दिग्गज क्रिकेटर, मुलाच्या टीम इंडियातील निवडीवेळी मीटिंग सोडून गेले होते बाहेर
हे वाचलंच पाहिजे! विश्वचषक 1983 स्पर्धेतील दुर्लक्षित नायक, ज्याने कैफ अन् युवराजलाही दिलेलं प्रशिक्षण