हेमिल्टन। आज(5 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सेडन पार्क येथे पहिला वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 247 धावा केल्या आहेत. भारताकडून आज श्रेयस अय्यरने शतकी खेळी केली आहे.
त्याने 107 चेंडूंचा सामना करताना 103 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला. हे त्याचे कारकिर्दीतील पहिलेच शतक आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडमध्ये श्रेयसचा हा पहिलाच वनडे सामना आहे. त्यामुळे तो न्यूझीलंडमध्ये पहिलाच वनडे सामना खेळताना शतकी खेळी करणारा तिसराच भारतीय फलंदाज ठरला आहे.
याआधी न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना खेळताना राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी शतकी खेळी केली होती. द्रविडने तौपो येथे 9 जानेवारी 1999ला न्यूझीलंडमधील पहिला वनडे सामना खेळताना नाबाद 123 धावांची खेळी केली होती. तर विराटने 19 जानेवारी 2014 ला न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना खेळताना 123 धावांचीच शतकी खेळी केली होती.
मात्र या दोघांनाही न्यूझीलंडमध्ये पहिले शतक केल्यानंतर पुन्हा शतकी खेळी करता आलेली नाही. द्रविडने न्यूझीलंडमध्ये एकूण 12 सामने खेळले, तर विराटने आत्तापर्यंत 9 सामने खेळले.
तसेच आत्तापर्यंत न्यूझीलंडमध्ये खेळताना भारताच्या 5 खेळाडूंनी शतके केली आहेत. यात अय्यर, द्रविड आणि विराटसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवागचा सामवेश आहे. सेहवागने न्यूझीलंडमध्ये 3 शतके केली आहेत. तर सचिनने 1 शतक केले आहे.
#न्यूझीलंडमध्ये पहिल्याच वनडे सामन्यात शतकी खेळी करणारे भारतीय –
123* – राहुल द्रविड
123 – विराट कोहली
103 – श्रेयस अय्यर
#न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक वनडे शतके करणारे भारतीय क्रिकेटपटू –
3 – विरेंद्र सेहवाग
1 – राहुल द्रविड
1 – श्रेयस अय्यर
1 – विराट कोहली
1 – सचिन तेंडूलकर






