कोलकाता। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील पहिला क्वालिफायर सामना मंगळवारी (२४) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात गुजरातने ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह गुजरातने अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे आयपीएल २०२२ हंगामात अंतिम सामना गाठणारा गुजरात पहिला संघ ठरला आहे.
गुजरातसाठी (Gujarat Titans) हा पहिलाच आयपीएल हंगाम देखील आहे. त्यामुळे आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात अंतिम सामना खेळणारा गुजरात तिसरा संघ ठरला आहे. यापूर्वी असा पराक्रम केवळ चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघांनी केला आहे. या दोन्ही संघांनी २००८ साली पहिल्याच आयपीएल हंगामात अंतिम सामना खेळला होता. त्यावेळी राजस्थानने चेन्नईला पराभूत करत पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
गुजरातला ट्रॉफी जिंकण्याची संधी
आयपीएलच्या १५ हंगामांचा इतिहास पाहिला, तर लक्षात येते की, आत्तापर्यंत हंगामात सर्वात आधी अंतिम सामना गाठणाऱ्या संघांनी सर्वाधिकवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. आत्तापर्यंत २००८, २००९, २०११, २०१२, २०१४, २०१५, २०१८, २०१९, २०२० आणि २०२१ या हंगामात सर्वात प्रथम अंतिम सामना गाठणाऱ्या संघांनी विजेतेपद जिंकले आहे. विशेष म्हणजे गेल्या चार हंगामात तर पहिल्यांचा अंतिम सामना गाठणारा संघच आयपीएलचा विजेता ठरला आहे.
आत्तापर्यंत केवळ २०१०, २०१३, २०१६ आणि २०१७ हे चारच असे हंगाम आहेत, ज्यात अंतिम सामन्यात प्रवेश केलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या संघांनी विजेतेपद मिळवले आहे. हा इतिहास पाहिला, तर गुजरात देखील त्या संघांमध्ये सामील होऊ शकतात, ज्यांनी हंगामात सर्वात आधी अंतिम सामना गाठून विजेतेपद जिंकले आहे (1st team to reach IPL finals).
आत्तापर्यंत सर्वाधिक आयपीएल विजेतेपद (Most IPL Trophy Winner) जिंकण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. त्यांनी ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्स असून त्यांनी चारवेळा आयपीएल जिंकण्याचा पराक्रम केला आहे, तर २ विजेतेपदांसह कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद यांनी आत्तापर्यंत प्रत्येकी एकदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.
आयपीएल २०२२ हंगामाचा (IPL 2022) अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.
आयपीएल हंगामात सर्वात आधी अंतिम सामना गाठणारे संघ आणि त्यांचा निकाल
२००८ – राजस्थान रॉयल्स (विजेते)
२००९ – डेक्कन चार्जर्स (विजेते)
२०१० – मुंबई इंडियन्स (उपविजेते)
२०११ – चेन्नई सुपर किंग्स (विजेते)
२०१२ – कोलकाता नाईट रायडर्स (विजेते)
२०१३ – चेन्नई सुपर किंग्स (उपविजेते)
२०१४ – कोलकाता नाईट रायडर्स (विजेते)
२०१५ – मुंबई इंडियन्स (विजेते)
२०१६ – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (उपविजेते)
२०१७ – रायझिंग पुणे सुपरजायंट्स (उपविजेते)
२०१८ – चेन्नई सुपर किंग्स (विजेते)
२०१९ – मुंबई इंडियन्स (विजेते)
२०२० – मुंबई इंडियन्स (विजेते)
२०२१ – चेन्नई सुपर किंग्स (विजेते)
२०२२ – गुजरात टायटन्स (?)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
असं काय घडलं? पंड्या, बटलर, मिलरबरोबरच केवळ ३ धावा करणाऱ्या जयस्वालचे झाले जोरदार कौतुक; पाहा Video
Qualifier 1 | डेविड मिलरची ‘किलर’ खेळी! माजी टीमला रडवलं अन् गुजरातला थेट फायनलमध्ये पोहोचवलं
‘भारताचे गॅरी सोबर्स’ अशी ओळख मिळवणारे दिग्गज, २६ सामन्यांच्या कारकिर्दीत रचला होता विक्रमांचा ढीग