कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाची चर्चा करायची म्हटलं, तर तो जागितक विक्रम पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार मिस्बाह उल हकच्या नावावर आहे. त्याने २०१४मध्ये अबू धाबी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना केवळ २१ चेंडूत अर्धशतक ठोकत जॅक कॅलिसचा २४ चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम मोडला होता.
सर्वात वेगवान कसोटी अर्धशतक करणाऱ्या अव्वल ५ फलंदाजांमध्ये एकाही भारतीय खेळाडूच्या नावाचा समावेश नाही. मिस्बाहनंतर डेव्हिड वॉर्नरचा नंबर येतो. त्याने २०१७मध्ये सिडनी येथे पाकिस्तानविरुद्ध केळताना २३ चेंडूत अर्धशतक केले होते. त्यानंतर कॅलिस, शेन शिलिंगफोर्ड (२५चेंडू, विरुद्ध- न्यूझीलंड, २०१४), शाहिद आफ्रिदी (२६ चेंडू, विरुद्ध- भारत, २००६), मोहम्मद अश्रफुल (२६ चेंडू, विरुद्ध- भारत, २००७) आणि डेल स्टेन (२६ चेंडू, विरुद्ध- वेस्ट इंडीज, २०१४) या खेळाडूंचे नाव येते.
या लेखात आपण त्या २ भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांंनी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला आहे.
कसोटीत वेगवान अर्धशतक करणारे २ भारतीय- 2 Indian Batsmen Fastest Half Century Test Record
२. विरेंद्र सेहवाग (३२ चेंडू, विरुद्ध- इंग्लंड, २००८)
भारतीय संघाचा दिग्गज माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) २००८मध्ये चेन्नई येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात केवळ ३२ चेंडूत धडाकेबाज अर्धशतक केले होते. त्याच्या ६८ चेंडूतील ८३ धावांच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारतीय संघाने इंग्लंडला ६ विकेट्सने पराभूत केले होते. इंग्लंडने पहिल्या डावात ३१६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा पहिला डाव २४१ धावांवर संपुष्टात आला होता. त्यामुळे इंग्लंडने ७५ धावांची आघाडी घेतली होती आणि दुसरा डाव ९ बाद ३११ धावांवर घोषित केला होता. त्यामुळे भारतीय संघापुढे विजयासाठी ३८७ धावांचे भलेमोठे आव्हान होते.
त्यावेळी भारताने सेहवागच्या उत्कृष्ट अर्धशतकी आणि सचिन तेंडुलकरच्या (१०३) नाबाद शतकी खेळीमुळे केवळ ४ विकेट्स गमावत इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळविला होता. याव्यितिरिक्त युवराज सिंगने नाबाद ८५ आणि गौतम गंभीरने ६६ धावांची चमकदार खेळी केली होती.
१. कपिल देव (३० चेंडू, विरुद्ध- पाकिस्तान, १९८२)
भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांच्या नावावर भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. १९८२ मध्ये कराची येथे पाकिस्तानविरुद्ध ६ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात कपिल देव यांनी केवळ ३० चेंडूत अर्धशतक ठोकले होते आणि ५३ चेंडूत ७३ धावा केल्या होत्या.
त्यांनी इतकी चांगली खेळली असली तरीही त्याचा भारतीय संघाला फायदा झाला नाही. तसेच त्या सामन्यात भारताला एक डाव आणि ८६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भारताच्या पहिल्या डावातील १६९ धावांचे प्रतिउत्तर देताना पाकिस्तानने तब्बल ४५२ धावा ठोकल्या होत्या आणि २८३ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावातही भारतीय संघ अपयशी ठरला आणि संपूर्ण संघ केवळ १९७ धावांवर संपुष्टात आला.
ट्रेंडिंग लेख-
-१२ पेक्षा कमी चेंडू खेळूनही मॅन ऑफ द मॅच ठरलेले ३ खेळाडू
-अबब! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५००० पेक्षा जास्त धावा करणारे टॉप ५ खेळाडू
-बॉलिवूड फिल्ममध्ये आपलीच भूमिका निभावणारे ३ भारतीय खेळाडू