क्रिकेटला सहसा फलंदाजांचा खेळ म्हटले जाते. परंतु, गोलंदाजांनीही त्यांच्या दमदार प्रदर्शनाने क्रिडाजगतात आपली छाप पाडली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये होणारा संघर्ष आपणास अनेकदा पाहायला मिळाला आहे. परंतु, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असाही पराक्रम घडला आहे, ज्यामध्ये गोलंदाजांचे परडे फलंदाजांपेक्षा जास्त जड दिसून आले.
५ दिवस एक कसोटी सामना खेळला जातो. त्यामध्ये दोन्ही संघ प्रत्येकी २ डाव खेळत असतात. या ५ दिवसीय कसोटी सामन्याच्या १४३ वर्षांच्या इतिहासात फक्त २ वेळा असे झाले आहे की, कसोटी सामन्यातील चारही डाव फक्त एकाच दिवसात संपले आहेत. विशेष म्हणजे, भारतावरही एकदा अशी वेळ आली होती- 2 Times In Test History When 4 Innings Of Match Happened On The Same Day
सर्वप्रथम इंग्लंड-वेस्ट इंडिज संघांवर आली होती ही वेळ
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चारही डाव एकाच दिवसात खेळण्याचा अनोखा विक्रम सर्वप्रथम इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघांच्या नावावर नोंदला गेला आहे. ३० जून २००० मध्ये क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या ऐतिहासिक सामन्याची नोंद झाली होती.
त्यावेळी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार ऍलेक स्टीवर्टने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० जूनला वेस्ट इंडिज संघ २६७ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंड संघाचा पहिला डाव फक्त १३४ धावांवर संपुष्टात आला. वेस्ट इंडिजच्या कर्टले एंब्रोस आणि कर्टनी वॉल्श यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रत्येकी ४ विकेट्स ४८.२ षटकात इंग्लंड पहिला डाव संपु्ष्टात आणला होता. त्यामुळे वेस्ट इंडिज संघ १३३ धावांनी आघाडीवर होता.
परंतु, वेस्ट इंडिज संघाच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचे गोलंदाज अँड्र्यू कॅडिक याने फक्त १६ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तर, डोमिनिक कॉर्कने फक्त १३ धावा देत ३ विकेट्स चटकावल्या आणि डॅरेन गफने १७ धावा देत २ विकेट्स घेत वेस्ट इंडिजची बोलती बंद केली होती. वेस्ट इंडिजचा दुसरा डाव फक्त ५४ धावांवर संपुष्ठात आला होता. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी दूसऱ्या डावात १८८ धावांची आवश्यकता होती.
इंग्लंडने ३० जूनलाच सामन्यातील चौथा आणि आपला दूसरा डाव खेळताना सुरुवातीलाच मार्क रामप्रकाशची विकेट गमावली होती. परंतु, तिसऱ्या दिवशी कॉर्कच्या नाबाद ३३ धावांनी संघाला २ विकेट्सने विजय मिळवून दिला होता. परंतु, ३० जूनला सामन्यातील चारही डाव झाल्याने इतिहास रचला गेला होता.
२००२ मध्ये भारतीय संघाने केला होता हा अनोखा विक्रम
डिसेंबर २००२मध्ये भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. यावेळी दोन्ही संघात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. दरम्यान भारताने एका दिवसात ४ डाव खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. १९ डिसेंबरला हेमिल्टन येथे या सामन्याची सुरुवात झाली होती. पण पावसामुळे पहिल्या दिवशी सामना खेळला गेला नाही.
तर, दुसऱ्या दिवशीही पावसामुळे भारताचा पहिला डाव ८ बाद ९२ धावांवर संपवावा लागला. अखेर तिसऱ्या दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला भारताचा पहिला डाव ९९ धावांवर संपुष्ठात आला. यामध्ये न्यूझीलंडच्या शेन बॉन्ड आणि डॅरिल टफी यांनी प्रत्येकी ४ विकेट्सचे योगदान होते.
परंतु, भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान याच्या २९ धावा देत घेतलेल्या ५ विकेट्समुळे न्यूझीलंडचा पहिला डाव फक्त ९४ धावांवर संपुष्ठात आला. यामध्ये हरभजन सिंग आणि आशिष नेहराच्या प्रत्येकी २ विकेट्सचाही समावेश होता. त्यामुळे भारताला ५ धावांची आघाडी मिळाली होती. महत्त्वाचे म्हणजे, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणता संघ पहिल्या डावात १००पेक्षा कमी धावांवर सर्वबाद झाला असेल आणि विरुद्ध संघाला आघाडीही मिळाली असेल.
पुढे त्याच दिवशी (२१ डिसेंबर) भारताचा दुसरा डाव खेळण्यात आला. यावेळी डॅरिल टफी आणि जॅकोब ओरमने भारताच्या प्रत्येकी ४-४ फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे भारत केवळ १५४ धावांवर सर्वबाद झाला होता. अखेर त्याच दिवशी (२१ डिसेंबर) न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाचीही सुरुवात झाली आणि एकही विकेट न गमावता इंग्लंडने २४ धावा केल्या. पुढे चौथ्या दिवशी म्हणजे २२ डिसेंबरला न्यूझीलंडने ६ विकेट्स गमावत १६० धावा केल्या आणि ४ विकेट्सने तो सामना खिशात घातला.
परंतु, २१ डिसेंबरलाच चारही डाव झाल्याने इतिहास रचला गेला होता.
ट्रेंडिंग लेख-
येणाऱ्या क्रिकेट हंगामात ‘या’ ५ खेळाडूंच्या कामगिरीवर…
‘पार्ट टाईम गोलंदाजी’ करताना ५ विकेट्स घेणारे ३ दिग्गज भारतीय फलंदाज
वनडेत कासवगतीने शतकी खेळी करणारे ५ भारतीय फलंदाज