आज २० जून, हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी खूप खास आहे. कारण या दिवशी एक मोठा योगायोग घडला आहे. तो असा की भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांचे कसोटी पदार्पण हे २० जूनला झाले आहे.
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर २५ वर्षांपूर्वी २० जून १९९६ ला राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. दोघांसाठीही हे पदार्पण खास ठरले होते. या सामन्यात गांगुलीने पहिल्या डावात १३१ तर द्रविडने ९५ धावांची खेळी केली होती. संजय मांजरेकर आणि सुनील जोशी या दोन खेळाडूंच्या जागी या दोघांना संधी देण्यात आली होती.
एवढेच नाही तर गांगुलीने या सामन्यात शतक करण्याबरोबरच पहिल्या डावात २ तर दुसऱ्या डावात १ विकेट देखील घेतली होती. पुढे जाऊन गांगुली आणि द्रविड या दोघांनीही भारताच्या कसोटी संघाच्या नेतृत्वाची धूरा देखील सांभाळली. तसेच त्यांनी जगातील एक दिग्गज खेळाडू म्हणून नावही कमावले.
गांगुलीने कसोटी पदार्पण करण्याआधी १९९२ ला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून वनडे पदार्पण केले होते. परंतू एक सामना खेळल्यानंतर त्याला संघातून काढण्यात आले. त्यानंतर त्याने भारतीय संघात येण्यासाठी ४ वर्षे वाट पाहिली. अखेर त्याची प्रतिक्षा फळाला आली आणि १९९६ च्या इंग्लंड दौऱ्यात त्याला भारतीय संघात संधी मिळाली.
या दौऱ्यात तो वनडे सामनाही खेळला तसेच याच दौऱ्यात २० जून १९९६ला त्याला पहिला कसोटी सामना खेळायला मिळाला. त्यानेही ही संधी हातून सोडली नाही.
द्रविड बाबत बोलायचे झाले तर द्रविडनेही कसोटी पदार्पण करण्याआधी भारताकडून वनडे पदार्पण केले. त्याने ३ एप्रिल १९९६ ला श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला इंग्लंड दौऱ्यासाठीही संधी मिळाली. या दौऱ्यात त्याने कसोटी पदार्पणही केले.
कसोटी पदार्पणानंतर द्रविडने भारताकडून तब्बल १६४ कसोटी सामने खेळले तर गांगुलीने ११३ कसोटी सामने खेळले. आज घडीला द्रविडपेक्षा फक्त ४ खेळाडूंनी जास्त कसोटी सामने खेळले आहेत.
गांगुली आणि द्रविड यांचा काळ संपत असताना भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली या ताऱ्याचा उगम होत होता. द्रविड आणि गांगुली यांच्या कसोटी पदार्पणाच्या १५ वर्षांनंतर विराटने २० जून २०११ ला वेस्ट इंडिज विरुद्ध किंग्स्टन येथे कसोटी सामन्यात पदार्पण केले. विशेष म्हणजे विराटनेही पुढे जाऊन भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. तसेच सध्या तो कसोटीमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधार देखील आहे.
त्यामुळे २० जून ही तारिख भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाची ठरली. आणखी एक खास गोष्ट म्हणजे भारताकडून सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये द्रविड, विराट आणि गांगुली हे तिघेही पहिल्या १० फलंदाजांमध्ये आहेत. द्रविडने १३२८८ धावा, गांगुलीने ७२१२ धावा आणि विराटने ७५३४ धावा कसोटीमध्ये खेळताना केल्या आहेत.
सध्या द्रविड आणि गांगुली निवृत्त झाले आहेत. तर विराट अजूनही खेळत असून भारतीय संघाचा कर्णधार आहे. तसेच गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. तर द्रविड बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे.
हे माहित आहे का?
विराटने २० जून २०११ ला जरी कसोटी पदार्पण केले असले तरी त्याचे वनडे पदार्पण १८ ऑगस्ट २००८ मध्ये डांबुलाच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध केले होते. त्याने कसोटी पदार्पण करण्याआधी ५९ वनडे सामने खेळले होते. तसेच ५ शतके आणि १५ अर्धशतकांसह २१५३ धावा केल्या होत्या.
त्याच्या या पदार्पणाचा एक किस्सा असा की ९ वर्षांनंतर जेव्हा विराट पुन्हा श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा तो डंबुला येथे होणाऱ्या सामन्याआधी भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये त्याच खुर्चीवर बसला होता ज्या खुर्चीवर तो पहिल्या वनडे सामन्याच्या वेळी बसला होता. बीसीसीआयने हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून शेयर देखील केला होता.
Few things never change – only the legend grows. #ThisDayThatYear In 2008, @imVkohli sat on this very chair during his debut game #SLvIND pic.twitter.com/0LCwQKZQ1i
— BCCI (@BCCI) August 18, 2017
त्या ९ वर्षांच्या कालावधीत विराटने क्रिकेट जगातावर वर्चस्व प्राप्त केले. तो जेव्हा पहिल्यांदा त्या खुर्चीत बसला होता तेव्हा तो असा युवा खेळाडू होता ज्याला स्वत:ला सिद्ध करायचे होते. तर ९ वर्षांनंतर तो भारताचा तिन्ही प्रकारात नेतृत्व करत होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘मागच्या वर्षी डावलले पण यावर्षी टी-२० विश्वचषकात चहल गेम चेंजर ठरणार’, माजी दिग्गजांचे भाकीत
ऑस्ट्रेलियाचा दिग्गजही धोनीचा ‘जबरा फॅन!’, सोशल मीडियावर शेअर केली अभिमानास्पद पोस्ट
ENG vs NZ | इंग्लंडला मोठा झटका, शेवटच्या कसोटीतून दिग्गज गोलंदाजाची माघार