भारताला फिरकी गोलंदाजांचे माहेरघर समजले जाते. सुभाष गुप्ते हे भारताचे पहिले प्रसिद्ध फिरकी गोलंदाज होते. इरापल्ली प्रसन्ना, चंद्रशेखर आणि बिशनसिंग बेदी यांच्या तिकडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हुकूमत गाजवली. त्यानंतर नरेंद्र हिरवानी व रवी शास्त्री यांनी काही काळ ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
अनिल कुंबळे व हरभजन सिंग यांनी भारतीय फिरकीला आधुनिक क्रिकेटमध्ये सर्वोच्च स्तरावर नेण्याचे काम केले. २०११ नंतर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने तर अनेक विक्रम आपल्या नावे केले. सध्या कुलदीप यादव हा युजवेंद्र चहलच्या सोबतीने भारतीय फिरकीची परंपरा पुढे नेत असलेला दिसत आहे.
आज आपण, अशा तीन युवा फिरकीपटूंविषयी जाणून घेऊया, जे भविष्यात भारतीय फिरकीचा वारसा जपताना दिसतील.
१) रवी बिश्नोई
राजस्थानच्या या १७ वर्षीय लेगस्पिनरची जादू संपूर्ण क्रिकेटविश्वाने २०२० च्या एकोणीस वर्षाखालील विश्वचषकात पाहिली आहे. भारतीय संघाकडून खेळताना रवीने १७ बळी आपल्या नावे करत स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाचा मान मिळवला होता.
रवीने आत्तापर्यंत राजस्थानसाठी विजय हजारे चषकात सहा सामने खेळून आठ बळी तर सय्यद मुश्ताक अली चषकात सहा सामन्यात सहाच बळी मिळविले आहेत.
आयपीएल २०२० साठीच्या लिलावामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने २ कोटी इतकी रक्कम देऊन त्याला खरेदी केले आहे. पंजाब संघाचा प्रशिक्षक, भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे हा असल्याने त्यामध्ये अजून सुधारणा होऊ शकते.
२) वॉशिंग्टन सुंदर
२०१७ आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत भारतीय संघात दाखल झालेला वाशिंग्टन सुंदर भारताच्या टी२० संघात दिसतो. फिरकी गोलंदाजासोबत तो उत्तम फलंदाज असल्याने संघाला त्याचा फायदा होतो.
वॉशिंग्टन सुंदरने आत्तापर्यंत भारतीय संघासाठी २३ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये १९ बळी मिळविताना त्याची सरासरी ६.९३ इतकी किफायतशीर राहिली आहे. २०१८ निदहास ट्रॉफीचा मालिकावीर म्हणून देखील त्याची निवड झाली होती.
आयपीएलमध्ये सध्या तो, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघात खेळत आहे. आयपीएल मध्ये शानदार कामगिरी करत तो राष्ट्रीय संघात आपली जागा पक्की करू शकतो.
३) राहुल चहर
भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चहर याचा भाऊ असलेला लेगस्पिनर राहुल चहर भारतीय युवा खेळाडूंमध्ये सर्वाधिक एक प्रतिभावान म्हणून गणला जातो. २०१६ युवा विश्वचषक सदस्य ते भारतीय संघ असा त्याचा प्रवास प्रगतीकडे झालेला आहे.
राहुलने भारतीय संघासाठी एक टी२० सामना खेळलेला आहे. परंतु, त्याने घरगुती क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केलेली आहे. २०१८-१९ च्या विजय हजारे ट्राॅफीमध्ये नऊ सामन्यात त्याने २० बळी मिळवले होते. याचसोबत सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचा देखील तो सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेला.
२०१७ पासून तो आयपीएलमध्ये सहभागी होत आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट संघाकडून पदार्पण केल्यानंतर, पुढील वर्षी मुंबई इंडियन्सने त्याला १.९० कोटी रुपये देऊन आपल्या ताब्यात सामील करून घेतले. २०१९ आयपीएलच्या अंतिम सामन्यात त्याला ड्रीम ११ गेम चेंजर ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला होता.