विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) अशा मोठ्या टूर्नामेंटमध्ये खेळायचं म्हटलं की, क्रिकेटपटू मोठ्या उत्साहाने तयारीला लागतात. तसं तर, प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यापुर्वी क्रिकेटपटू सराव करत असतात. परंतु, मोठ्या टूर्नामेंटसाठी ते जास्त मेहनत घेतात.
यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक खेळण्यात येणार होता. परंतु, कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषक २०२२मध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि आयपीएल २०२०च्या आयोजनासाठी कालावधी (विंडो) मिळाला. पण, २०२२ सालच्या टी२० विश्वचषकापुर्वी भारतात २०२१मध्ये टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे.
१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये खेळणारे बरेचसे खेळाडू टी२० विश्वचषक २०२१चा भाग असतील. त्यामुळे बऱ्याच खेळाडूंना आयपीएलद्वारे विश्वचषकाचा सराव होईल. या लेखात, त्या ५ फलंदाजांची माहिती देण्यात आली आहे, जे आयपीएलच्या तेराव्या हंगामादरम्यान टी२० विश्वचषक २०२१ची तयारी करतील. 5 Batsman Who Prepare For T20 World Cup 2021 Through IPL 2020
विराट कोहली (Virat Kohli)
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची आयपीएल इतिहासातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये गणना केली जाते. विराटने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १७७ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ३७.८५च्या सरासरीने ५४१२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतकांचा आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये विराटचा स्ट्राईक रेट १३१.६१ इतका आहे. तसेच त्याचा आयपीएलमधील सर्वाधिक स्कोर ११३ इतका आहे. भारतीय संघाचा कर्णधार असल्याच्या नात्याने विराटच्या खांद्यावर खूप जिम्मेदाऱ्या आहेत. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स संघाचे नेतृत्त्व करणारा विराट आयपीएल २०२०द्वारे टी२० विश्वचषक २०२१ची देखील तयारी करेल.
ऑयन मॉर्गन (Eoin Morgan)
ऑयन मॉर्गन हा इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा कर्णधार आहे. मॉर्गनने गतवर्षी वक्तव्य केले होते की, आयपीएल २०१९मध्ये खेळल्यामुळे त्याच्या संघातील खेळाडूंना विश्वचषक २०१९मध्ये खूप फायदा झाला होता. त्यामुळे यंदाही मॉर्गन आयपीएल २०२०ला टी२० विश्वचषक २०२१च्या तयारीच्या दृष्टीने पाहील.
मॉर्गनने आतापर्यंत आयपीएलमध्ये ५२ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २१.३५च्या सरासरीने ८५४ धावा केल्या आहेत. त्याचा आयपीएलमधील स्ट्राईक रेट हा १२१.१३ इतका आहे. आतापर्यंत मॉर्गनची आयपीएल आकडेवारी जास्त चांगली राहिली नाही. परंतु, आयपीएलच्या तेराव्या हंगामात तो आपल्या आकडेवारीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल.
कायरन पोलार्ड (Kieron Pollard)
कायरन पोलार्ड आयपीएलच्या तिसऱ्या हंगामापासून मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. २०१०मध्ये त्याची आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघात निवड झाली होती. तेव्हापासून पोलार्डने मुंबईचे प्रतिनिधित्त्व करत १४८ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २८.७च्या सरासरीने व १४६.७८च्या स्ट्राईक रेटने २७५५ धावा केल्या आहेत. शिवाय आपल्या गोलंदाजी प्रदर्शनाने पोलार्डने आयपीएलमध्ये ५६ विकेट्स घेतल्या आहेत.
यंदा पोलार्ड आपल्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याच्या प्रयत्नात असेल. सोबतच तो आयपीएलमध्ये खेळताना टी२० विश्वचषक २०२१चीही तयारी करेल. कारण, पोलार्ड हा सध्या वेस्ट इंडिजच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघांचा कर्णधार आहे.
डेव्हिड वॉर्नर (David Warner)
ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत १२६ आयपीएल सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ४३.१७च्या सरासरीने आणि १४२.३९ च्या स्ट्राईक रेटने ४७०६ धावा केल्या आहेत. वॉर्नरने आयपीएलमध्ये ४ शतके आणि ४४ अर्धशतके देखील लगावली आहेत. वॉर्नरचे वय वाढत आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यापुर्वी आपल्या संघाला विश्वविजेता बनण्याचा प्रयत्न करेल. त्या अनुशंगाने वॉर्नर आयपीएल २०२०द्वारे पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकाची तयारी करेल.
रोहित शर्मा (Rohit Sharma)
रोहित शर्माने त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सला ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहे. रोहित जेवढा चांगला कर्णधार आहे, तेवढाच चांगला तो फलंदाजदेखील आहे. आयपीएलमध्ये चौकार-षटकारांचा वर्षाव करत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रोहितचा ५वा क्रमांक लागतो. रोहितने आयपीएलमध्ये १८८ सामने खेळत ३१.६च्या सरासरीने ४८९८ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा १३०.८२ इतका होता.
रोहितने आयपीएलमध्ये १ शतक आणि ३६ अर्धशतके केली आहेत. रोहितला पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकाची तयारी करण्यासाठी आयपीएल २०२० ही चांगली संधी आहे.
ट्रेंडिंग लेख –
केवळ एका वनडे सामन्यात संघाचे नेतृत्त्व करायला मिळालेले ३ भारतीय दिग्गज
अ दर्जाच्या क्रिकेटमधील ५ दिग्गज भारतीय खेळाडू, जे वनडे क्रिकेटमध्ये ठरलेत फ्लॉप
या १० फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये मारलेत सर्वाधिक षटकार; एका भारतीयाचाही आहे समावेश
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाबमधील नव्या स्टेडियमला देण्यात येणार ‘या’ माजी कसोटीपटूचे नाव
ब्रेट लीची भविष्यवाणी कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली ‘हा’ संघ जिंकणार आयपीएलचे विजेतेपद
सचिन, गांगुली, सेहवाग नाही तर ‘या’ भारतीय फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करताना शोएब अख्तरला यायचे टेंशन