मुंबई । 2011 मध्ये आयपीएलचा चौथा हंगाम आयोजित करण्यात आला होता. त्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला आपले विजेतेपद वाचविण्यात यश आले होते आणि सीएसके सलग दुसऱ्यांदा ‘चॅम्पियन’ बनले होते. सलग दोन वेळा आयपीएल विजेतेपद जिंकण्याचा त्यांचा विक्रम अद्याप अबाधित आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने 2010 मध्ये प्रथमच आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते.
2011 मध्ये चेन्नई येथे झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना शानदार सुरुवात केली. त्यांच्याकडून मायकल हसी आणि मुरली विजयने 159 धावांची सलामी भागीदारी रचत सीएसकेला भक्कम सुरुवात दिली. सीएसकेकडून हसीने त्या सामन्यात 45 चेंडूत 63 धावा केल्या होत्या आणि विजयने 52 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांसह 95 धावांची खेळी केली होती. तसेच धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 22 धावा जोडल्या होत्या. त्यामुळे चेन्नईने 5 बाद 205 धावा उभारत आरसीबीला 206 धावांचे आव्हान दिले.
धावांचा पाठलाग करताना आरसीबी संघाला 20 षटकात 8 बाद 147 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून सौरभ तिवारीने सर्वाधिक 42 धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीने 35 धावांची खेळी केली होती आणि झहिर खानने 21 धावा जोडल्या होत्या. मात्र अन्य कोणत्याही फलंदाजाला खास काही करता आले नव्हते. सीएसकेकडून आर अश्विनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या.
या विजयाबरोबरच आणखी एक विक्रम सीएसकेने आपल्या नावावर केला होता. सीएसके आपल्या घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवणारा पहिला संघ ठरला होता. आत्तापर्यंत कोणत्याच संघाला घरच्या मैदानावर आयपीएलचे विजेतेपद मिळवता आलेले नाही.
या अंतिम सामन्याआधी पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीचाच पराभव करून सीएसकेने अंतिम फेरी गाठली होती, तर दुसर्या क्वालिफायरमध्ये सीएसकेने मुंबई इंडियन्सचा पराभव करून आयपीएलच्या चौथ्या हंगामातील अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
या हंगामात आरसीबीच्या ख्रिस गेलने 608 धावा केल्या आणि ऑरेंज कॅप पटकावली होती. गेलने संपूर्ण हंगामात 44 षटकार ठोकले होते. तसेच मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाने पर्पल कॅप मिळवली. त्याने संपूर्ण हंगामात 16 सामने खेळले आणि 28 बळी घेतले होते. त्याचबरोबर या हंगामात सर्वात नेत्रदीपक कामगिरी इशांत शर्माने केली होती, त्याने कोची टस्कर्स केरळविरुद्ध 12 धावा देऊन पाच बळी घेतले होते.