मुंबई । जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने दुसर्या टी -20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. रविवारी (6 सप्टेंबर रोजी) झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित षटकांत 157 धावा केल्या, प्रत्युत्तरात इंग्लंडने हे लक्ष्य सात चेंडूत राखून पार केले.
जोस बटलरने 54 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. तो सामनावीर ठरला. बटलरने ऍडम जॅम्पाच्या चेंडूवर जोरदार विजयी षटकार ठोकला. तिसरा आणि अंतिम टी -20 सामना याच मैदानावरच 8 सप्टेंबरला खेळवला जाईल.
बटलर आणि बेअरस्टोने डाव सांभाळला
इंग्लंडने 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतना सलामीचा फलंदाज जॉनी बेअरस्टोची विकेट केवळ 19 धावांत गमावली. मात्र, यानंतर मलान आणि बटलर यांच्यात मोठी भागीदारी झाली. दोघांनी मिळून 106 धावा केल्या. मलानने 32 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. मलान बाद झाल्यानंतर बटलरने बेथन, कर्णधार इयॉन मॉर्गन आणि मोईन अली यांच्यासह लहान भागीदारीसह संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. ऑस्ट्रेलियन गोलंदाज बरेच महागडे ठरले. केवळ अॅश्टन एगर आणि मिशेल स्टार्कने थोडी चांगली गोलंदाजी केली. एगरने 4 षटकांत 27 धावा देऊन 2 गडी बाद केले तर स्टार्कने 4 षटकांत 25 धावा देऊन 2 गडी बाद करण्यात यश मिळवले.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पुन्हा केले निराश
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला सुरुवात केली. पहिल्या पाच षटकांत 3 बाद 30 धावा केल्या. कर्णधार ऍरॉन फिंच (40) आणि मार्कस स्टोयनिस (35) बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची 13 व्या षटकांत पाच बाद 89 अशी अवस्था झाली. ग्लेन मॅक्सवेल (26) आणि अॅस्टन एगर (23) यांच्या डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला अखेरच्या सात षटकांत 68 धावा जोडता आल्या. इंग्लंडकडून आदिल राशिद आणि मार्क वूड यांनी प्रभावी गोलंदाजी केली तर ख्रिस जॉर्डन (40 धावांत 2 विकेट) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.