भारत आणि श्रीलंकेत ७ फेब्रुवारीपासून पुरूषांच्या टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. यासाठी जवळपास सर्व सहभागी देशांनी आपापले संघ जाहीर केले आहे. काहींना मात्र दुखापतीमुळे त्याच्यात बदल करावा लागला आहे. या स्पर्धेसाठी न्यूझीलंडने नुकतेच कायले जेमिसनची राखीवमधून मुख्य संघात निवड करत बेन सियर्सला ट्रॅव्हल रिजर्व म्हणून संघात घेतले आहे. ऑस्ट्रेलियानेही त्यांची संपूर्ण तयारी केली आहेतच, तसेच त्यांना काही अडचण आली ती दूर होण्याचा संभवही आहे. त्यांच्या एका खेळाडूने फलंदाजीत उत्तम लय दाखवत संघअधिकाऱ्यांसमोर पर्याय निर्माण केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा ‘कसोटी स्पेशालिस्ट’ स्टिव्ह स्मिथ नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी करत आला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून कमी टी२० सामने खेळले असले तरी नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) शतकी खेळी करत तो ही टी२०साठी सज्ज असल्याचे दिसते. त्याच्या या फॉर्मबाबत ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने तो विश्वचषकासाठी संघासमोर उत्तम पर्याय असू शकतो, असे मत व्यक्त केले आहे.
स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी ६७ टी२० सामने खेळले असून त्यामध्ये त्याने १०९४ धावा केल्या. तसेच १७ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याला संघात घेण्याबाबतचे कारण असे की त्याने बीबीएलच्या २०२५-२६ हंगामात ६ सामन्यात खेळताना जवळपास ६०च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने सिडनी सिक्सर्सकडून खेळताना २९९ धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट १६७.९७ राहिला. त्याचे ते वादळी शतक सिडनी थंडर्सविरुद्ध आले होते. त्याने ४२ चेंडूत ५ चौकार आणि ९ षटकारासह १०० धावा केल्या होत्या.
या स्पर्धेतील सर्वोत्तम सरासरीची यादी पाहिली तर स्मिथचा दुसरा क्रमांक लागतो. तसेच त्याने लागोपाठ दुसऱ्यांदा बीबीएलच्या हंगामात उत्तम सरासरीने धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ पाहिला तर सलामीची फळी उत्तम असून स्मिथला सध्या संघात स्थान मिळणे मात्र कठीण दिसत आहे.
“स्मिथने केलेली कामगिरी पाहता त्याला संधी मिळणे योग्य, मात्र ट्रेविस हेड आणि मिशेल मार्शच्या उपस्थितीत ते अवघड दिसते,” असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटींग म्हणाला आहे.
“ऑस्ट्रेलियाच्या टी२०मध्ये स्मिथसाठी कमी संधी होत्या, यामुळेच तो काही काळ संघाचा भागही नव्हता. तसेच जर सध्या संघात कुणाला दुखापत झाली तर त्याला संधी मिळू शकते”, असे पॉटींगने म्हटले असून त्याच्या बोलण्यातून स्मिथ आगामी विश्वचषकासाठी तत्पर असल्याचे कळते.
स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा टी२० सामना फेब्रुवारी २०२४मध्ये खेळला होता. संघ निवडताना ऑस्ट्रेलियाचा दृष्टीकोन पाहिला तर त्यांनी स्फोटक फलंदाजीची सुरूवात करून देणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे. जसे की मार्श आणि हेड. स्मिथनेही तो त्याप्रकारे खेळू शकतो हे बीबीएलमधून दाखवले आहे.






