मुंबई । इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन इतिहास घडवण्याच्या मार्गावर आहे. अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 599 विकेट्स घेतल्या आहेत. 600 विकेट्स घेणारा तो जगातील पहिला वेगवान गोलंदाज होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तिसर्या कसोटीच्या चौथ्या दिवशी त्याचे स्वप्न पूर्ण झाले असले, तरी त्यांच्याच संघाने त्याची प्रतीक्षा वाढविली.
जेम्स अँडरसनने पाकिस्तानच्या अबिद अलीला पायचीत करत कसोटी क्रिकेटमध्ये 599 वी विकेट घेतली. आबिद 42 धावांवर बाद झाला. तथापि, तो गोलंदाजी करत असताना इंग्लंडच्या संघाने बर्याच चुका केल्या. त्यांनी चार महत्त्वपूर्ण झेल सोडले.
इंग्लंड संघाने अँडरसनच्या 37 चेंडूच्या आत चार झेल सोडले. पहिल्या सत्रातील पाचव्या षटकात अँडरसनने टाकलेला एक चेंडू शानच्या बॅटला स्पर्श करत यष्टीरक्षक जोस बटलरपर्यंत पोहोचला होता. पण तो झेल पकडण्यात अपयशी ठरला. यापूर्वी तिसर्या दिवशीही रोरी बर्न्स आणि जॅक क्रॉलीने त्याच्या चेंडूवर झेल सोडले. पाकिस्तानच्या दोन्ही डावात इंग्लंड संघातील खेळाडूंनी अँडरसनच्या गोलंदाजीवर चार झेल सोडले.
आज जर (25 ऑगस्ट) अँडरसन 1 विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर तो 600 कसोटी विकेट्स घेणारा जगातील चौथा गोलंदाज तर पहिला वेगवान गोलंदाज ठरेल. आतापर्यंत मुथय्या मुरलीधरन (800) शेन वॉर्न (708) आणि अनिल कुंबळे (619) यांनी 600 हून अधिक बळी मिळवले आहेत पण ते सर्व फिरकीपटू आहेत.