भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. २७ नोव्हेंबर पासून वनडे मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्याआधी दोन्ही संघातील खेळाडूंनी या दौऱ्यातील मालिकांच्या तयारी विषयी भाष्य केले आहे. आता यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचाही समावेश झाला आहे. त्याला भारताविरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये चांगल्या कामगिरीचा विश्वास आहे.
आयपीएल २०२० मध्ये ग्लेन मॅक्सवेलचे अतिशय साधारण प्रदर्शन होते आणि अनेक संधी देऊनसुद्धा त्याच्या फलंदाजीतून धावा निघाल्या नाहीत. तरीसुद्धा त्याला विश्वास आहे की तो येणाऱ्या एकदिवसीय मालिकेत चांगले प्रदर्शन करेल.
आयपीएलचा १३ वा हंगाम सुरु होण्याआधी मॅक्सवेलचे प्रदर्शन खूपच चांगले राहिले होते. सलग दोन शतके झळकावून तो किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघात सामील झाला होता. तरीसुद्धा आयपीएलमध्ये त्याच्या फलंदाजीतून काही विशेष धावा निघाल्या नाहीत. त्याने एकूण तेरा सामन्यांमध्ये फक्त १०८ धावा केल्या आणि या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट फक्त १०१.८८ इतका होता. या सोबतच संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने एकही षटकार लगावला नाही. मॅक्सवेलच्या मते त्याला खेळपट्टी विषयी चिंता नव्हती, पण फलंदाजीच्या क्रमांकाविषयी समस्या होती.
ईएसपीएनक्रिकइन्फो सोबत बोलताना तो म्हणाला, “खेळपट्टीचा फार काही फरक पडत नाही. माझ्या मते,जेव्हा मी फलंदाजीसाठी यायचो तेव्हा खूपच कमी वेळ राहिलेला असायचा, मला एक तर संपूर्ण डाव उभा करण्याची किंवा पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळण्याची गरज असायची. जर तुम्ही आक्रमक खेळला नाही तर अडचणीत येता. मी आता सुद्धा खूप कसून मेहनत घेत आहे आणि योग्य गोष्टींवर काम करत आहे. ओल्ड ट्रॅफर्डमध्येबहुदा मी माझ्या कारकीर्दीतली सर्वात चांगली फलंदाजी करून आलो होतो. तरीसुद्धा आयपीएलमध्ये मला एकही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मारता येत नव्हता.”
जर ऑस्ट्रेलिया संघाला भारताविरुद्ध वनडे मालिकेमध्ये विजयी व्हायचे असेल तर ग्लेन मॅक्सवेलला चांगले प्रदर्शन करावे लागेल. ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजीची जबाबदारी त्याच्यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
कहर! आयपीएल २०२०मध्ये ‘त्याची’ एक धाव संघाला पडली तब्बल १० लाखांना
रोहित, इशांत कसोटी खेळण्यावर प्रश्नचिन्ह; शास्त्री म्हणाले, जर त्यांना कसोटी खेळायची असेल तर…
‘टीम इंडिया’ जिममध्ये गाळतेय घाम; पंड्याने दाखवली ‘मसल्स पॉवर’, Video जोरदार व्हायरल