राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलचा पहिला सत्र जिंकला. मोठे स्टार खेळाडू नसतानाही शेन वॉर्नच्या नेतृत्वात संघाने आयपीएलच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद जिंकून सर्वांना चकित केले. राजस्थान रॉयल्स संघाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, सुरुवातीपासूनच त्यांच्या संघात जास्त स्टार खेळाडू नसून, त्यांच्याकडे बरेच उपयुक्त खेळाडू आहेत, जे स्वतःहून सामने जिंकण्यास सक्षम आहेत. राजस्थान रॉयल्स संघ नेहमीच युवा खेळाडूंवर बरीच गुंतवणूक करतात आणि जर एखादा तरुण प्रतिभावान खेळाडू असेल तर ते लिलावात खरेदी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडू राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळले आहेत. यातील बरेच खेळाडू यशस्वी झाले आहेत, तर काही इतके यशस्वी झाले नाहीत. या संघात असे बरेच खेळाडू आहेत ज्यांचा इतर टी-२० क्रिकेट सामान्यांचा विक्रम चांगला आहे, परंतु राजस्थान रॉयल्ससाठी ते फ्लॉप ठरले. अशा ३ टी-२० दिग्गजांविषयी जाणून घेऊ जे राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना मोठा कामगिरी करण्यात अपयशी ठरले.
राजस्थान रॉयल्ससाठी फ्लॉप झालेले ३ टी-२० मधील दिग्गज खेळाडू
३. बेन कटिंग (Ben Cutting)
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू बेन कटिंग हा देखील एकावेळी राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य होता परंतु त्याला संघात जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. २०१४ च्या आयपीएल हंगामात बेन कटिंग राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य होता आणि त्याला एकच सामना खेळण्याची संधी होती. त्या सामन्यात त्याने फक्त ८ धावा केल्या आणि गोलंदाजीत ४ षटकांत ३१ धावा देऊन एक बळी घेतला.
बेन कटिंग हा टी-२० क्रिकेटचा जबरदस्त खेळाडू आहे आणि तो जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळतो. आयपीएल २०१६ च्या अंतिम सामन्यात त्याने सनरायझर्स हैदराबादकडून जबरदस्त कामगिरी केली. त्याने त्याच्या संघाला अंतिम सामना जिंकून देत आयपीएल विजेता बनवण्यात मोलाचं योगदान दिले होते. परंतु राजस्थान रॉयल्सकडून बेन कटिंगने मात्र चांगली कामगिरी केली नाही.
२. टीम साऊथी (Tim Southee)
आयपीएल २०२० च्या लिलावापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने टीम साऊथीला सोडले. तो आरसीबीसाठी खूप महागडा खेळाडू असल्याचे सिद्ध झाले. २०१४-१५ मध्ये जेव्हा तो राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य होता त्या संघाकडूनही तो फ्लॉप झाला होता. २०१४ च्या आयपीएल हंगामात टीम साऊथीला ३ सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. त्याचप्रमाणे २०१५ च्या हंगामात त्याने ७ सामन्यांत फक्त ६ बळी मिळवले.
१. डार्सी शॉर्ट (D’Arcy Short)
बिग बॅश लीगमध्ये डार्सी शॉर्टने आपल्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. बीबीएलच्या ४५ सामन्यांत त्याने ४६.२१ च्या प्रभावी सरासरीने आणि १४३.३६ च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने १८०२ धावा केल्या. यावेळी डार्सीने १५ अर्धशतके आणि ३ शतकेही ठोकली होती. परंतु, राजस्थान रॉयल्सकडून ७ सामन्यांत तो केवळ १६.४२ च्या सरासरीने ११५ धावाच करू शकला. आयपीएलमध्ये डार्सी राजस्थान रॉयल्ससाठी पूर्ण फ्लॉप ठरला.