---Advertisement---

आमची ‘ही’ योजना कधीच बदलत नाही; विजयानंतर धोनीने पहिल्यांदाच सांगितले संघाचे रहस्य

On: सोमवार, ऑक्टोबर 5, 2020 7:00 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० च्या हंगामात सलग तीन पराभवांनंतर अखेर रविवारी(४ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सची गाडी विजयी मार्गावर परतली. चेन्नईने किंग्स इलेव्हन पंजाबचा १० विकेट्सने पराभव करत या हंगामातील दुसरा विजय नोंदवला. या विजयानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने म्हटले आहे की छोट्या छोट्या गोष्टी योग्य पद्धतीने केल्याने संघाला यश मिळाले.

पंजाबने चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७८ धावा करत १७९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने १७.४ षटकातच एकही विकेट न गमावता पूर्ण केला. चेन्नईकडून फाफ डु प्लेसिसने नाबाद ८७ धावा आणि शेन वॉटसनने नाबाद ८३ धावा केल्या.

धोनी सामन्यानंतर म्हणाला, ‘मला वाटते की आम्ही छोट्या छोट्या गोष्टी योग्य पद्धतीने केल्या. फलंदाजी करताना आम्हाला जसे अपेक्षित होते तशीच सुरुवात मिळाली. आशा आहे की पुढील सामन्यांमध्येही याची पुनरावृत्ती करु.’

तसेच वॉटसन आणि डु प्लेसिसच्या फलंदाजीबद्दल धोनी म्हणाला, ‘इथे केवळ आक्रमकताच हवी असे काही नाही. वॉटसन नेटमध्ये चांगली फलंदाजी करत होता आणि त्याला खेळपट्टीवर त्याची पुनरावृत्ती करायची होती. ही केवळ काळाची बाब होती. तसेच फाफ हा आमच्यासाठी आधारस्तंभासारखा आहे. तो चांगले फटके खेळत आहे. तो नेहमी गोलंदाजांना त्याच्या लॅप शॉटमुळे गोंधळात टाकतो. संघात जास्त बदल न करणे ही अशी एक गोष्ट आहे जी आम्ही करतो आणि कधी कधी फ्लेमिंगला त्याचे श्रेय मिळत नाही.’

याबरोबरच धोनीने पुढे सांगितले की पंजाबला कमी धावसंख्येवर रोखने महत्त्वाचे होते. तो म्हणाला, ‘पहिले ३-४ सामने पाहिल्यानंतर मला वाटले की जर आम्ही त्यांना कमी धावसंख्येवर रोखू शकलो तर त्यांना दबाव येईल. सर्व संघांकडे आक्रमक फलंदाज आहेत, जे गोलंदाजांवर वर्चस्व निर्माण करु शकतात. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.’

चेन्नईचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्सशी ७ ऑक्टोबरला होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---