भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारताच्या महान कर्णधारांपैकी एक आहे. २०१८मध्ये त्याने आपले आत्मचरित्र लिहिले आहे. यात त्याने तो खेळत असलेल्या दिवसांबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
त्याच्या आत्मचरित्राचे नाव ‘अ सेन्चुरी इज नॉट इनफ’ असे असून त्याने यात कॅप्टनकूल एम एस धोनीबद्दलही काही मते मांडली आहेत. गांगुलीने त्याच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की “जेव्हा मी सतत अशा खेळाडूच्या शोधात होतो जो दबावाच्या परिस्थिती स्थिर राहू शकेल आणि ज्याच्यात सामना फिरवण्याची क्षमता असेल, तेव्हा २००४ मध्ये एम एस धोनी माझ्या नजरेत आला. मला पहिल्या दिवसापासून धोनीने प्रभावित केले होते.”
धोनीने त्याचे आंतराष्ट्रीय पदार्पण डिसेंबर २००४ मध्ये केले होते. त्यावेळी भारताचा कर्णधार गांगुली होता. तसेच गांगुलीने धोनीला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली होती. त्यानंतर धोनीने क्रिकेटमध्ये अनेक यशाची शिखरे सर केली आहेत.
गांगुलीने पुढे धोनी २००३ विश्वचषकात असायला हवा होता अशी इच्छा व्यक्त करताना म्हटले आहे की ” माझ्या २००३ च्या विश्वचषकाच्या संघात धोनी असायला हवा होता. मला सांगितले होते की जेव्हा आम्ही २००३ च्या विश्वचषकातील अंतिम सामना खेळत होतो, तेव्हासुद्धा धोनी भारतीय रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टरचे काम करत होता. हे अविश्वसनीय आहे.”
भारतीय संघ २००३ विश्वचषकात उपविजेता ठरला होता. त्यांना ऑस्ट्रेलिया संघाने १२५ धावांनी पराभूत करून विश्वचषक जिंकला होता.
पुढे गांगुलीने म्हटले आहे, ” धोनीने माझे अंदाज खरे ठरवल्याचे आज मला आनंद आहे. आज तो जे काही आहे त्यासाठी तो ज्या गोष्टीतून गेला आहे ते आश्चर्यकारक आहे.”
गांगुलीने २००८ मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने आत्तापर्यंत ११३ कसोटी सामन्यात खेळताना ७२१२ धावा केल्या आहेत तर ३११ वनडे सामन्यात ११३६३ धावा केल्या आहेत.
गांगुलीने २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळून निवृत्ती स्वीकारली होती. यावेळी धोनी कर्णधार होता. या सामन्यात धोनीने गांगुलीबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी शेवटच्या काही षटकात त्याला नेतृत्व करण्यास सांगितले होते.
सध्या गांगुली भारतीय क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-३८ वर्षीय ३ खेळाडू जे करु शकतात आयपीएलमध्ये धमाका
-तीने माझं फेसबुक अकाऊंट हॅक केलं, तेव्हापासून मी एफबी वापरणं सोडलं
-आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टाॅप ५ खेळाडू