कोरोना महामारीमुळे पूर्णता बंद असलेले क्रिकेट जगत पुन्हा नव्याने रुळावर यायला लागले आहे. या महामारीमुळे तयार झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) करताना दिसून येतेय. त्याचाच एक भाग म्हणून आयसीसीने भारतात होणारा २०२३ वनडे विश्वचषक सहा महिने पुढे ढकलला आहे.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार फेब्रुवारी-मार्च २०२३ यादरम्यान होणारा हा विश्वचषक आता ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये खेळला जाईल. आयसीसीच्या पदाधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिली आहे.
म्हणून विश्वचषक ढकलला गेला पुढे
आगामी वनडे क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये खेळला जाणार आहे. भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवेल. आधी ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये खेळणे निश्चित झाले होते. मात्र, विश्वचषकासाठीची पात्रता फेरी लांबली गेल्याने आता हा विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये खेळला जाईल.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू सहानी यांनी याबाबत सांगताना म्हटले, “आयसीसी वनडे विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलला गेला आहे. स्पर्धेसाठीचे पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला. विश्वचषकास पात्र होण्यासाठी सर्व संघांना समान संधी मिळावी हा त्यामागचा हेतू आहे.”
संघांना करावे लागणार आहे पात्रता फेरीचे दिव्य पार
आयसीसी २०२३ क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. त्यामुळे भारता स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरला. त्यानंतर तेरा पैकी सात संघ वर्ल्डकप सुपर लीगमधील कामगिरीच्या आधारे विश्वचषकासाठी पात्र ठरतील. उर्वरित पाच संघांना वर्ल्डकप लीग २ स्पर्धेतील अव्वल तीन संघांविरुद्ध खेळावे लागेल. तर, दोन संघांना २०२२ मधील वर्ल्डकप क्वालिफायर खेळावे लागणार आहेत. विश्वचषकाच्या पात्रतेसाठी या वर्षाच्या सुरुवातीला आयसीसीने वर्ल्डकप सुपर लीगची सुरुवात केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीचा नादच खुळा! मोडला सर विवियन रिचर्ड्स यांचा ‘मोठा’ विक्रम
‘कोणत्याही परिस्थितीत मला तिथे उपस्थित रहायचे आहे’, पालकत्व रजेवर बोलताना विराटचे वक्तव्य
दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला विराट; केली ‘ही’ अचाट कामगिरी