---Advertisement---

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ संघ, अव्वल स्थानी धोनीची सीएसके नव्हे तर…

On: सोमवार, सप्टेंबर 14, 2020 5:50 PM
---Advertisement---

२००८ साली सुरु झालेल्या इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आतापर्यंत १२ हंगाम पूर्ण झाले आहेत. आयपीएलमध्ये २०११ चा मोसम १० संघांना घेऊन खेळवण्यात आला होता. तर २०१२ आणि २०१३ च्या मोसमात ९ संघांचा समावेश होता. पण २०१४ पासून आत्तापर्यंत ८ संघच आयपीएलमध्ये प्रत्येकवर्षी खेळले आहेत. आत्तापर्यंत आयपीएलच्या इतिहासात १३ संघ खेळले आहेत. पण त्यातील आता केवळ ८ संघ सक्रिय आहेत. तर ५ संघ आता आयपीएलमध्ये काही काळासाठीच होते.

सध्या आयपीएलचा भाग असणाऱ्या एकूण ८ संघांमध्येही ५ संघ असे आहेत, ज्यांनी एकदा तरी आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तर, आतापर्यंत एकूण ९ संघांनी अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे.

आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी संघांना हंगामातील अधिकाधिक सामने जिंकावे लागतात. आयपीएल इतिहासात अनेक संघांनी ५० पेक्षा जास्त सामने जिंकले आहेत. तर काही असेही संघ आहेत, ज्यांची विजयाची टक्केवारी खुप कमी आहे. या लेखात आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या ५ संघांविषयी माहिती देण्यात आली आहे. (IPL Teams With Most Match Win)

५. किंग्स इलेव्हन पंजाब – ८० सामने

किंग्स इलेव्हन पंजाब या संघाचा आयपीएल इतिहास जास्त विशेष राहिला नाही. बॉलिवुड अभिनेत्री प्रीति झिंटाच्या पंजाब संघानेही आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरलेले नाही. पंजाब हा संघ फक्त एकदा २०१४मध्ये अंतिम सामन्यांपर्यंत पोहोचला होता. पंजाबने आयपीएल इतिहासात एकूण १७६ सामने खेळले आहेत. त्यापैकी ८० सामन्यांत विजय तर ९४ सामन्यांत पराजय स्विकारला आहे. तसेच, २ सामने बरोबरीत सुटले आहेत. अशाप्रकारे त्यांची विजय टक्केवारी ४६.०२ इतकी आहे. याव्यतिरिक्त पंजाबने आतापर्यंत ८१ वेळा नाणेफेक जिंकली आहे.

४. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – ८३ सामने

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १८१ सामने खेळले आहेत. त्यापैकी ८३ सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. तर, ९२ सामने गमावले आहेत. शिवाय, २ सामने बरोबरीत सुटले आहेत. आरसीबीच्या विजयाची टक्केवारी ४७.४५ इतकी आहे. तसेच, त्यांनी आतापर्यंत ३वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे. २००९, २०११ आणि २०१६ अशा तीन हंगामात त्यांनी हा पराक्रम केला होता. पण, दुर्दैवाने तिन्हीवेळा त्यांच्या वाट्याला अपयश आले आहे.

३. कोलकाता नाईट रायडर्स – ९२ सामने

बॉलिवुड किंग शाहरुख खानच्या मालकीचा कोलकाता नाईट रायडर्स संघ हा २ वेळा आयपीएलचा विजेता संघ ठरला आहे. १२ हंगामात एकूण १७८ सामने खेळणाऱ्या केकेआरने ९२ सामने जिंकले आहेत. तर, ८३ सामने गमावले आहेत. त्यांचे ३ सामने बरोबरीतही सुटले आहेत. म्हणून केकेआरची विजय टक्केवारी ५२.५२ इतकी आहे. तसेच, केकेआरने आतापर्यंत ९२ सामन्यांत नाणेफेक जिंकली आहे.

केकेआरच्या आयपीएल २०१४ची सुरुवात वाईट झाली होती. त्यांना प्लेऑफमधअये जागा बनवण्यासाठी ६ पैकी ५ सामने जिंकायचे होते. परंतु, केकेआरने दमदार प्रदर्शन करत ६ पैकी ६ सामने जिंकले आणि प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर सलग ३ नॉकआउट सामने जिंकून ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.

२. चेन्नई सुपर किंग्स – १०० सामने 

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या १२ हंगामांपैकी १० हंगाम खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी ७वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे आणि त्यातील ३वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे. एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील सीएसकेने आयपीएलमध्ये एकूण १६५ सामने खेळले आहेत. त्यापैकी १०० सामने जिंकले आणि ६३ सामने गमावले आहेत. तर, एक सामना अनिर्णीत आणि १ सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे त्यांची विजयी टक्केवारी ६१.२८ इतकी आहे.

१. मुंबई इंडियन्स – १०७ सामने 

मुंबई इंडियन्स हा आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा विजेतेपद मिळवणारा संघ आहे. त्यांनी आतापर्यंत ४वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये १८७ सामने खेळले आहेत. त्यापैकी १०७ सामन्यात विजय आणि ७८ सामन्यात पराजयाचा सामना केला आहे. तर, २ सामने बरोबरीत सुटले आहेत. त्यामुळे त्यांची विजयी टक्केवारी ही ५७.७५ इतकी आहे.

९८ वेळा सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने २०१३ला पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी रोहित शर्मा हा पहिल्यांदा संघाचा कर्णधार बनला होता. त्यानंतर २०१५, २०१७ आणि २०१९ या आयपीएल हंगामात त्यांनी विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, २०१३, २०१५ आणि २०१९ मध्ये अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सचा विरुद्ध संघ चेन्नई सुपर किंग्स होता.

ट्रेंडिंग लेख –

आयपीएलच्या सर्व संघातील डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, जे १३व्या हंगामात करु शकतात कमाल

एमएस धोनीच्या सीएसके संघातील ३ फ्लॉप खेळाडू, ज्यांच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होतं मोठ नाव

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-२ फलंदाज, ज्यांनी धोनी, विराट आणि रोहितलाही टाकलयं मागं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---