जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेकदा चौकार आणि षटकारांचा वर्षांव होताना दिसतो. आयपीएल इतिहासात आतापर्यंत अनेक जबरदस्त फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांनी ताबडतोब खेळी केल्या आहेत. याचे उदाहरण म्हणजे, ब्रेंडन मॅक्युलम. मॅक्युलमने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध १५८ धावांची तूफानी खेळी केली होती. यामध्ये १० चौकारांचा आणि १३ षटकारांचा समावेश होता.
मॅक्युलमसह आयपीएलमध्ये ताबडतोब फलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत हार्दिक पंड्या, ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, शेन वॉटसन, सुरेश रैना, एमएस धोनी, जोस बटलर, ऍरोन फिंच अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे. परंतु, कोणत्याही फलंदाजाला ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी चौकार आणि षटकारांची गरज भासते. जेवढे जास्त चेंडू सीमारेषेबाहेर जातात, तेवढी त्या फलंदाजाच्या प्रसिद्धीत वाढ होते.
आयपीएल इतिहासात आजवर सर्वाधिक षटकार मारण्याऱ्या भारतीय खेळाडूंविषयी बोलायचे झाले तर, चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचा यात पहिला क्रमांक लागतो. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १९० सामन्यात २०९ षटकार मारले आहेत. तर, १९४ षटकारांसह रोहित शर्मा (१८८ सामने) आणि सुरेश रैनाचा (१९३ सामने) अनुक्रमे दूसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. तसेच, विराट कोहली या यादीत १९० षटकारांसह चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.
परंतु, आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या जगातील सर्व खेळाडूंच्या यादीमध्ये पहिला आणि दूसरा क्रमांक हा परदेशी खेळाडूंनी पटकावला आहे.
चला तर बघूयात, नक्की कोण आहेत हे २ खेळाडू, ज्यांनी आयपीएलमध्ये मारलेत सर्वाधिक षटकार – (Top-2 Batsman Who Hit Most Sixes In IPL History)
२. एबी डिविलियर्स –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा दूसरा फलंदाज आहे. आजवर डिविलियर्सने आपल्या विस्फोटक खेळीने संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. आयपएलमध्ये त्याच्या सर्वाधिक धावा या नाबाद १३३ इतक्या आहेत.
डिविलियर्सने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १५४ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २१२ षटकार मारत ४३९५ धावा केल्या आहेत. शिवाय त्याचा स्ट्राईक रेटही १५१.२३ इतका आहे.
१. ख्रिस गेल –
‘युनिव्हर्सल बॉस’ नावाने प्रसिद्ध असणारा ख्रिस गेल हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा पहिला फलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये इतके षटकार मारले आहेत की, त्याच्या षटकारांच्या जवळपासही कोणताही फलंदाज पोहोचू शकला नाही. शिवाय, आयपीएल आणि टी२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वैयक्तिक धावा (नाबाद १७५) करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.
गेलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १२५ सामन्यात ४४८४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३२६ षटकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये ३०० षटकारांचा आकडा पार करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
ट्रेंडिंग लेख –
या ५ दिग्गज परदेशी खेळाडूंना आयपीएल २०२० दरम्यान क्वचितच मिळेल खेळण्याची संधी…
आयपीएल २०२० मध्ये हे ५ मोठे विक्रम मोडण्याची शक्यता…
क्रिकेटमधील ३ अशा घटना, जेव्हा सौरव गांगुलीने केली ‘दादागिरी’