आयपीएल म्हटलं की नेहमीच खेळाडूंना मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयांची चर्चा होते. खेळाडूला प्रत्येक चेंडूमागे किंवा धावेमागे मिळणाऱ्या पैशांचा हिशोब लावला जातो. हे अगदी आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून सुरु आहे. आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंबरोबरच अनेक परदेशी खेळाडूंना देखील कोट्यावधी रुपये मिळत असतात.
असेच आयपीएलमध्ये कोट्यावधी रुपयांची कमाई करणारे हे ५ परदेशी खेळाडू –
आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे ५ परदेशी खेळाडू
१. एबी डिविलिर्स –
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स हा आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणारा परदेशी खेळाडू आहे. तो मागील १० मोसमांपासून रॉयल चॅलेंजर्स संघाचा भाग आहे. त्याला बेंगलोरने २०११ च्या आयपीएलसाठी संघात घेतले होते. त्यावेळी त्यांनी त्याच्यासाठी ५ कोटी ६ लाख रुपये मोजले होते. त्याच्या पुढच्या २ मोसमासाठीही डिविलियर्सला बेंगलोर संघाने ५ कोटीपेक्षा जास्त रुपये दिले.
तसेच २०१४ ते २०१७ पर्यंत बेंगलोरने डिविलियर्ससाठी प्रत्येकी ९ कोटी ५० लाख रुपये मोजले. २०१८ ला त्याला बेंगलोर संघाने ११ कोटी रुपयांमध्ये संघात कायम केले. २०१८ पासून २०२० च्या मोसमापर्यंत त्याला बेंगलोरकडून प्रत्येकी ११ कोटी रुपये मिळत आहेत.
तसेच डिविलियर्स २००८ ते २०१० या ३ वर्षात दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळला. या तीन वर्षात त्याला प्रत्येकी १ कोटींहून अधिक पैसे मिळत होते. डिविलियर्सने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १५४ सामन्यात खेळताना ४३९५ धावा केल्या आहेत.
२. सुनील नारायण –
वेस्ट इंडिजचा गोलंदाज सुनील नारायण २०१२ पासून आयपीएल खेळत आहे. त्याच्या गोलंदाजी शैलीने सर्वांना त्याने सुुरुवातीला प्रभावित केले होते. परंतू आता तो एक अष्टपैलू खेळाडू म्हणूनही चांगली कामगिरी करताना दिसत आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा परदेशी खेळाडू आहे.
विशेष म्हणजे नारायण २०१२ पासून आत्तापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स या एकाच संघाचा भाग राहिला आहे. त्याला कोलकाताने २०१२ ला ३.५ कोटी रुपयांना खरेदी करत संघात घेतले होते. त्यांनी २०१३ साठीही त्याच्यासाठी ३.७ कोटी रुपये मोजले.
कोलकाताने २०१४ ते २०१७ पर्यंत त्याला कायम करताना प्रत्येकवर्षी ९ कोटी ५० लाख रुपये मोजले. यानंतर २०१८ च्या आयपीएलसाठीही त्यांनी त्याला संघात कायम केले आहे. नारायणने आत्तापर्यंत ११० आयपीएल सामने खेळले असून ७७१ धावा केल्या आहेत आणि १२२ विकेट्स घेतल्या आहेत.
३. शेन वॉट्सन –
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉट्सनने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत अनेक संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. तो आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारा तिसऱ्या क्रमांकाचा परदेशी खेळाडू आहे. वॉट्सनने आत्तापर्यत आयपीएलमध्ये अनेक महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत.
तो सर्वात आधी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे. त्याच्यासाठी राजस्थानने २००८ ला ५० लाखांहून अधिक रुपये मोजले होते. तो राजस्थानकडून २०१५ पर्यंत खेळला. राजस्थानने त्याच्यासाठी २०११ ते २०१३ पर्यंत ५ कोटींहून अधिक रक्कम मोजली. तर २०१४ आणि २०१५ साठी त्यांनी १२.५ कोटी रुपये त्याला दिले.
२०१६ मध्ये वॉट्सन रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामील झाला. तो तिथे २ वर्षे खेळला. त्याच्यासाठी त्यांनी दोन्ही मोसमात ९.५ कोटी रुपये मोजले. वॉट्सनला २०१८ ला चेन्नई सुपर किंग्सने ४ कोटी रुपयांना खरेदी केले असून तो आता सध्या चेन्नईचा भाग आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १३४ सामने खेळले असून ३५७५ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ९२ विकेट्सही घेतल्या आहेत.
४. किरॉन पोलार्ड –
वेस्ट इंडिज संघाच्या मर्यादीत षटकांचा कर्णधार किरॉन पोलार्ड आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारा चौथ्या क्रमांकाचा परदेशी खेळाडू आहे. तो २०१० पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मुंबईने त्याला सर्वात पहिल्यांदा २०१० ला ३.४ कोटी रुपये देऊन संघात घेतले होते. २०११ पासून ते २०१४ पर्यंत मुंबईने त्याच्यासाठी प्रत्येकवर्षी ४ कोटींहून अधिक खर्च केला.
२०१५ ते २०१७ पर्यंत त्याला मुंबईने प्रत्येकवर्षी ९.५ कोटी रुपये त्याला दिले. तर २०१८ ला त्याला त्यांनी ५.४ कोटी रुपयांना मुंबईने कायम केले. पोलार्ड आत्तापर्यंत मुंबईने जिंकलेल्या आयपीएलच्या ४ विजेतेपदांमध्ये सहभागी होता. त्याने आत्तापर्यंत १४८ सामने मुंबईकडून खेळले असून २७५५ धावा केल्या आहेत. तर ५६ विकेट्स घेतल्या आहेत.
५. डेव्हिड वॉर्नर –
ऑस्ट्रेलिया सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैद्राबाद संघाने २०१६ ला आयपीएलचे विजेतेपदही मिळवले होते.
तो २०१० ते २०१३ दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळला. दिल्लीने पहिले २ मोसम त्याच्यासाठी १ कोटींहून अधिक रक्कम मोजली. तर २०१२ आणि २०१३ ला त्याला दिल्लीने ३ कोटींहून अधिक रुपये दिले.
२०१४ त्याला सनरायझर्स हैद्राबादने ५.५ कोटी रुपयांना संघात सामील करुन घेतले. त्याला २०१७ पर्यंत त्यांनी प्रत्येकवर्षी ५.५ कोटी रुपये दिले. तर २०१८ ला त्याच्यावर चेंडू छेडछाडप्रकरणी आलेल्या बंदीमुळे तो खेळला नाही. पण २०१९ ला त्याने आयपीएलमध्ये पुनरागमन केले. त्याला २०१९ ला हैद्राबादने १२.५ कोटी रुपयांना कायम केले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
जेव्हा गांगुलीने ‘वॉटरबॉय’ बनण्यास दिला होता नकार…
१० हजार धावा करणाऱ्या टीम इंडियाच्या शिलेदाराने केले होते मराठी चित्रपटात काम
लिटिल मास्टर गावसरकरांचे चालू सामन्यात चक्क अंपायरने कापले होते केस!