मुंबई । वेस्ट इंडीज संघाने इंग्लंडचा साऊथम्पटन कसोटीत दारुण पराभव केला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी देखील घेतली. कोरोना महामारीच्या सावटात ही मालिका खेळवली जात असल्याने संपूर्ण क्रीडा जगताचे लक्ष या मालिकेकडे लागून राहिले होते. या पराभवामुळे इंग्लंडच्या संघावर चौफेर टीकेची झोड उठत आहे. तसेच इंग्लंडचे खेळाडू आणि त्यांच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज डॅरेन गॉफ म्हणाला की, “यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करावी लागणार आहे. अन्यथा त्याची जागा धोक्यात येऊ शकते. बटलरने मागील बारा डावात एकही अर्धशतक ठोकू शकला नाही. पहिल्या सामन्यात त्याने जार्मेन ब्लॅकवूड यांचा सुरेख झेल टिपला होता. ब्लॅकवूडने 95 धावांची बहारदार खेळी करत वेस्ट इंडिजला चार गडी राखून विजय मिळवून दिला.”
इंग्लंडकडून खेळताना 58 कसोटी सामन्यात 229 बळी टिपणारा गॉफ स्काय स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, “बटलरला त्याची कारकीर्द वाचवण्यासाठी दोन कसोटी सामने आहेत. तो एक शानदार खेळाडू आहे. अनेक युवा खेळाडू त्याच्यापासून प्रेरणा घेतात. त्याच्या भात्यात अनेक राजस फटके आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये लवकर बाद होण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे.”
“इंग्लंड संघाने स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स यांना संघात सामील करणे गरजेचे आहे. पण बेन स्टोक्सने या दोघांकडे दुर्लक्ष केले. पुढील सामन्यात वुड आणि अँडरसन यांना विश्रांती देऊन ब्रॉड आणि वोक्स यांना खेळवावे. एकापाठोपाठ कसोटी सामने होत असल्याने येथे ‘रोटेशन पॉलिसी’ वापरणे गरजेचे आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात अँडरसन आणि वोक्स यांना पुन्हा संघात घेता येऊ शकते,” असे गॉफने सांगितले.
इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन याने बेन स्टोक्सच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तो म्हणाला, “स्टुअर्ट ब्रॉड याला सामन्यात न खेळवणे हा चुकीचा निर्णय होता. इंग्लंडचा पहिला डाव 204 धावांवर आटोपला. फलंदाजी ही इंग्लंड संघासाठी चिंताजनक बाब आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. मात्र, इंग्लंडमध्ये ड्यूक चेंडूने खेळताना सुरुवात अडखळत झाली. जो रूट पहिल्या कसोटीत खेळला नसल्याने त्याचाही चांगला फटका इंग्लंड संघाला बसला.