साधारणत: क्रिकेटपटू जेव्हा एखाद्या देशाचा दौरा करत असतील, तेव्हा त्यांचे संपूर्ण लक्ष हे त्या मालिकेवर असते. त्याबरोबर आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करणे हे खेळाडूंच्या ध्यानी- मनी असते. परंतु असे बरेच क्रिकेटपटू होऊन गेले आहेत, ज्यांना परदेश दौरा करताना आपल्या जीवनसाथीची भेट झाली आहे. असेच इंग्लंडचे माजी दिग्गज कर्णधार आहेत, त्यांचे नाव आहे माइक ब्रेअर्ली. इंग्लंडचा हा दिग्गज खेळाडू १९७६-७७ साली भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी त्यांनी कल्पनाही केली नसेल की, त्यांचं भारताशी कायमचे नाते जोडले जाणार आहे.
लग्न करण्यासाठी ब्रेअर्लीने शिकली गुजराती
माइक (Mike Brearley) हे १९७६-७७मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाचे सदस्य होते. यादरम्यान त्यांची भेट गुजरातचे मोठे व्यावसायिक गौतम साराभाई यांची मुलगी माना साराभाई (Mana Sarabhai) हिच्याबरोबर झाली. दोघांनीही एकमेकांना पसंत केले होते. त्यावेळी डेट वगैरे असलं काहीही नव्हतं. त्यामुळे गोष्ट थेट लग्नापर्यंत येऊन पोहोचली. मानाचे वडील गौतम यांना असे वाटत होते की, त्यांच्या जावयाला गुजरातच्या संस्कृतीबद्दल माहती असायला पाहिजे. यामुळेच माइकने मानाशी लग्न करण्यापूर्वी ४ वर्षांंपर्यंत गुजराती भाषा शिकून घेतली. लग्नानंतर माना माइकबरोबर लंडनमध्ये स्थायिक झाली.
अहमदाबाद येथे माइक आणि माना ख्रिसमस साजरा करतात
लंडन मध्ये राहत असूनही माइक दरवर्षी ख्रिसमसच्या खास दिवशी संपूर्ण परिवारासहित भारतातल्या गुजरातमधील अहमदाबाद शहरात येतात. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ख्रिसमसच्या दरम्यान लंडनमध्ये खूप गर्दी असते. त्यावेळी ते या दिवशी भारतात येणे पसंत करतात. येथे ते आपल्या आणि मानाच्या कुटुंबासोबत दिवाळी आणि होळीप्रमाणे ख्रिसमसही साजरा करतात. यादरम्यान ते स्वत: पारंपारिक पदार्थही बनवतात. माइकला भारतीय जेवण खूप आवडते तसेच डाळ- भातापासून ते वाग्यांच्या भर्त्यापर्यंत सर्व पदार्थ बनवून पत्नी मानाला देतात.
त्यांची पत्नी मानाने सांगितले होते की, माइक भारतीय संस्कृतीशी त्यांची जोडलेली नाळ पाहून बडोदाचे महाराजही प्रभावित झाले होते. त्यांचे असे म्हणणे होते की, माइक हे परदेशी वाटत नाहीत. ते भारतीय असल्यासारखे वाटतात.
इंग्लंडचे कर्णधार माइक ब्रेअर्ली
माइक यांनी तब्बल ३१ सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचे नेतृत्व केले आहे, त्यातील केवळ ४ सामन्यांत त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. त्यांनी १९८१ साली ऍशेस मालिकेत इंग्लंड संघाला शानदार विजय मिळवून दिला होता. त्यांच्या नेतृत्वात इंग्लंड संघ १९७९ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता.
निवृत्ती घेतल्यानंतर आता ते सायको ऍनालिस्ट, सायकोथेरपिस्ट यांव्यतिरिक्त मोटिव्हेशनल स्पिकर म्हणूनही काम करतात.
ट्रेंडिंग घडामोडी-
-बुद्धिबळ खेळायला पैसे नसल्याने क्रिकेटर झालेला भारताचा स्टार खेळाडू, आज आहे…
-भारतासाठी आलेल्या मोठ्या गुड न्यूजमुळे पाकिस्तानच्या अख्तरचे दुखले पोट
-तब्बल १२ दिवस चालूनही ड्रॉ राहिलेला क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा कसोटी सामना