एक देश ज्याने कधीच कसोटी क्रिकेट खेळले नाही, जो क्रिकेटच्या बाबतीत सर्वात मागासलेला आहे. ज्यामधील खेळाडूंना हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक ओळखतात. त्याच देशाचा एक खेळाडू आज संपूर्ण जगभरात केवळ क्रिकेटच खेळत नाही, तर आपल्या वेगवान गोलंदाजीने त्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. तो देश आणि तो खेळाडू म्हणजेच नेपाळचा वेगवान गोलंदाज संदीप लामिछाने आहे.
संंदीप (Sandeep Lamichhane) वयाच्या केवळ १९ व्या वर्षी जगातील प्रत्येक मोठ्या क्रिकेट लीगमध्ये खेळतो. जगभरातील सर्वात मोठी टी२० लीग म्हणजेच आयपीएल असो किंवा ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग (Big Bash League) या लीगमध्ये तो त्याने आपला हात आजमावला आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत १० वनडे सामने आणि २१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने वनडेत २३ विकेट्स आणि टी२०त ३४ विकेट्स घेतल्या आहेत.
ही आकडेवारी पाहून समजते की, त्याची कारकीर्द आत्ता कुठे सुरु झाली आहे. असे असले तरी संदीप करोडो लोकांसाठी एक ज्वलंत उदाहरण आहे. त्याच्या कारकीर्दीतील टर्निंग पॉईंट खूप महत्त्वाचा होता. त्याबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
संदीपचा जन्म २ ऑगस्ट २००० मध्ये नेपाळच्या सायनगजा येथे झाला. गरीब परिवारात जन्मलेल्या संदीपचे वडील भारतीय रेल्वेमध्ये काम करत होते. ते तेथील चतुर्थश्रेणी कामगार होते. वडिलांचा पगार फार नव्हता. परंतु तरीही त्यांंनी संदीपला कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही. संदीप आपल्या वडिलांबरोबर भारतात आला आणि चौथ्या वर्गापर्यंत हरियाणामध्ये शिक्षण घेतले. इतक्या लहान वयातच संदीपची निवड हरियाणाच्या जिल्हास्तरीय संघात झाला होता. परंंतु यानंतर त्याच्या परिवाराला नेपाळच्या चितवनमध्ये परतावे लागले होते.
तरीही संदीपने हार मानली नाही आणि नेपाळचे माजी कर्णधार राजू खडका चालवत असलेल्या चितवनच्या क्रिकेट अकादमीमध्ये ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली.
संदीपवर नेपाळचे (Nepal) कर्णधार पारस खडका आणि नेपाळचे माजी प्रशिक्षक पुबुडू दसनायकेची नजर पडली. त्यावेळी संदीप गोलंदाजी करत होता. हे पाहून दोघेही प्रभावित झाले. यानंतर त्याची निवड नेपाळच्या १९ वर्षांखालील ट्रेनिंग कँपमध्ये झाली.
संदीप १९ वर्षांखालील विश्वचषकानंतर हाँगकाँग सिक्सेज स्पर्धा खेळण्यासाठी गेला. तिथे त्याची भेट ऑस्ट्रेलियाला २०१५मध्ये विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार मायकल क्लार्कबरोबर (Michael Clarke) झाली. क्लार्कने संदीपबद्दल ऐकले होते. परंतु असे असूनही क्लार्कने त्याच्या गोलंदाजीवर नेट्समध्ये खेळला. क्लार्कला विश्वास बसला नाही की, १६ वर्षांचा मुलगा इतकी कमालीची गोलंदाजी करत आहे. संदीपची गोलंदाजी शैली, त्याची विचार करण्याची पद्धत आणि खेळाबद्दल असलेली त्याची आवड क्लार्कला आवडली आणि त्याला ऑस्ट्रेलियाला येण्यास सांगितले.
क्लार्ककडून ऑफर मिळाल्यानंतर संदीप खुश झाला. परंतु त्याने क्लार्कला आपल्या खराब परिस्थितीबद्दल सांगितले. क्लार्कने संदीपची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने संदीपला ऑस्ट्रेलियामध्ये ३ महिन्याची ट्रेनिंग दिली. क्लार्कच्या अकादमीमध्ये संदीपने क्रिकेटमधील बारीक गोष्टी समजून घेतल्या. तसेच यानंतर त्याने पुन्हा मागे वळून पाहिले नाही.
संदीपला २०१८मध्ये आयपीएलमधील (IPL) फ्रंचायझी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने २० लाख रुपयांच्या मूळ किंमतीत संघात सामील करून घेतले. एका रखवालदाराच्या मुलाने इतक्या मोठ्या स्पर्धेत खेळणे खूप मोठी बाब होती. संदीपचा आयपीएलमध्ये दिल्ली संघात समावेश झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नेपाळबरोबर भारताच्या संबंधांबद्दल बोलताना संदीपचे नाव घेतले होते.
ते म्हणाले की, संदीप आयपीएलमध्ये खेळल्याने नेपाळ आणि भारतामधील संबंध आणखी मजबूत होतील. संदीपने आयपीएलमध्ये एकूण ९ सामने खेळले आहेत. त्यात त्याने १३ विकेट्स घेतले. आयपीएलनंतर संदीपने कॅरेबियन प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्येही खेळले आहे. इतकेच नव्हे तर त्याने ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
वयाच्या १९ व्या वर्षी नेपाळच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव गाजवणे, हे नक्कीच खूप मोठी बाब आहे.