-महेश वाघमारे
भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. दर पाच वर्षांनी भारतीय जनता आपल्या मतदान द्वारे देशाचे सरकार निवडत असते. दिल्लीच्या संसदेपासून ते शेवटच्या गावापर्यंतचे महत्त्वाचे निर्णय हे मतदानाद्वारे घेतले जातात. अशावेळी, भारतीय संघ तरी का मागे राहील? अशीच एक निवडणूक भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये झाली होती.
सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर ही भारताच्या वनडे क्रिकेटच्या सर्वोत्तम सलामीवीर जोडींपैकी एक. १९९६ पासून ही जोडी देशासाठी सलामीला उतरत. देशाच्या क्रिकेटमधील चांगल्या-वाईट गोष्टी या जोडीने पाहिल्या. अनेक विक्रम मोडले, विश्वविक्रम बनवले. लोक म्हणत, हे दोघे आहेत तोपर्यंत भारतीय संघात दुसरा सलामीवीर येणे अशक्यच आहे.
अशातच, भारतीय संघात दिल्लीच्या वीरेंद्र सेहवागची एन्ट्री झाली. बिलकुल सचिनची कॉपी असणारा सेहवाग. समान उंची, तीच खेळायची पद्धत, तीच आक्रमकता. अनेकांना जुना सचिन आठवू लागला.
कारकिर्दीच्या सुरुवातीला सेहवाग पाचव्या-सहाव्या क्रमांकावर येऊन ताबडतोड धावा जमवत. जॉन राइट यांच्या पारखी नजरेने सेहवागला ओळखले. ते त्याला वरच्या क्रमांकावर खेळवू लागले. पण, सलामीला सचिन सौरव यांचीच जोडी येत. सचिनच्या दुखापतीने सेहवागला सलामीला येण्याचा मौका मिळाला आणि त्याने तो सोडला नाही. मिळेल तितक्या संधीचे चांगल्या प्रदर्शनात रूपांतर करायला सुरुवात केली. पहिल्या आठ-दहा षटकात तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांना असा काय फोडून काढायला लागला की प्रेक्षक आणि तज्ञांनी सेहवागच्या नामाचा जयघोष करायला सुरुवात केली.
गांगुली आपल्या नेहमीच्याच फॉर्ममध्ये खेळत. बिचाऱ्या सचिनला दुखापतीतून सावरल्यावर मात्र मधल्या फळीत खेळायला यावे लागले. देशासाठी सचिन तयार झाला. पुढे, नेटवेस्ट ट्रॉफी, २००२ चॅम्पियन्स ट्रॉफी अशा स्पर्धांमध्ये गांगुली- सेहवाग यांनी ओपनिंग केली.
वाचा- ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन त्यांनी गांगुलीला रडवले
२००३ हे साल विश्वचषकाचे साल होते. भारतीय संघाचा फॉर्म पाहता “या वर्षी कप येणार” हे लोकांनी जाहीरच करून टाकले होते. विश्वचषकाच्या आधी भारताचा न्यूझीलंड दौरा होता. सात एकदिवसीय सामन्यांचे मोठी मालिका होती. दुखापतीमुळे सचिन पहिले चार सामने खेळणार नव्हता. भारत पहिले चार सामने हरला. गांगुली अपेक्षांवर खरा उतरला नाही. तर दुसरीकडे , सेहवागने एकट्याने न्यूझीलंडची बॉलिंग लाईन बेदरकारपणे चोपून काढली होती.
सचिन परत आल्यानंतर त्याच्या धावा होत्या ०,१,०. भारताने ती मालिका ५-२ अशा फरकाने गमावली. भारताच्या वाट्याला फक्त दोन सुखदायक बातम्या होत्या. सेहवागचे मालिकेतील २९९ रन्स व जवागल श्रीनाथच्या १८ विकेट्स. न्युझीलँडवरूनच भारतीय संघ वर्ल्डकपसाठी द. आफ्रिकेला रवाना झाला.
वर्ल्डकपच्या आधी न्युझीलँडकडून मिळालेली मात, सचिन-सौरवचा खराब फॉर्म या गोष्टी भारताला सतावत होत्या. “सचिन खेळला तरच वर्ल्ड कप जिंकताच येणार” ही धारणा होती. वर्ल्डकपच्या आधी दोन सराव सामन्यात गांगुली फ्लॉप झाला. सराव सामने म्हणून लोकांनी दुर्लक्ष केले पण संघ व्यवस्थापन चिंतेत होते.
वाचा- ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३: दादा गुडनाईट बोलून निघून गेला परंतू युवराज मात्र पूरता घाबरला
वर्ल्डकपची सुरुवात झाली. भारताने दुबळ्या नेदरलँडला हरवत विजयी सलामी दिली. गांगुली पुन्हा अपयशी. पुढचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियासोबत होता. ऑस्ट्रेलियाने भारतावर एकतर्फी वर्चस्व गाजवत भारताला १२५ धावांवर सर्वबाद करत जबर धक्का दिला. भारताने दिलेले आव्हान फक्त २२ षटकात पूर्ण करत त्यांनी भारताला झोपेतून जागे केले.
आता टीमसोबतच कोच जॉन राइट यांचेसुद्धा धाबे दणाणले होते. आता काही नाही केले तर दोन वर्षापासून घेत असलेली मेहनत वाया जाणार हे निश्चित होते. तिसरा सामना झिंबाब्वे सोबत होता.
जॉन राइट सचिनच्या रुममध्ये गेले. त्यांनी सचिनला तुला कोणत्या क्रमांकावर खेळायला आवडेल असे विचारल्यावर त्याने नेहमीप्रमाणे,
” ज्या जागी संघाला गरज असेल तिथे मी खेळेल.”
असे उत्तर दिले. राइट यांनी अजून खोदून विचारल्यावर मात्र त्याने ” ओपनिंग ” असे सांगितले.
आता, गांगुलीच्या खराब फॉर्ममुळे, राइट सेहवागला सचिनसोबत सलामीला पाठवू इच्छित होते पण हे सांगणार कसे म्हणून त्यांनी शक्कल लढवली.
त्यांनी सर्व खेळाडूंना एकत्रित केले आणि सचिनसोबत कोण सलामीला खेळणार हे चिट्ठीच्या माध्यमातून सांगण्यास सांगितले.
वाचा- ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग २: लक्ष्मणच्या अंघोळीने थांबला होता चालू कसोटी सामना
सर्व पंधरा खेळाडूंनी आपापली मते चिठ्ठीमध्ये लिहिली आणि सर्व चिठ्ठ्या राइट यांच्याकडे जमा केल्या. जेव्हा निकाल लागला तेव्हा सेहवागला १४ तर गांगुलीला १ मत मिळाले होते. सचिनसोबत सेहवाग ओपनिंग करणार यावर मोहर लागली होती. सौरव गांगुलीने संघहित लक्षात घेत दुजोरा दिला.
पुढे, पूर्ण वर्ल्डकपमध्ये सचिन-सेहवाग या जोडीने कोणालाही निराश केले नाही. त्या विश्र्वचषकानंतर २०१२ पर्यंत ही जोडी भारताची अव्वल सलामी जोडी म्हणून गाजली.
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स लेखमालेतील अन्य लेख-
-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १०: “जित्या, कपिल पाजींची तब्येत अचानक बिघडली आहे, चल लवकर.”
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ९: खेळाडू शांत व्हायचे नाव घेत नव्हते, अखेर सुत्र सचिनने हाती घेतली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ७: …आणि १८ वर्षांचा विराट पडला सचिनच्या पाया
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन त्यांनी गांगुलीला रडवले
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ५- त्यादिवशी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये निवडणूक झाली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३: दादा गुडनाईट बोलून निघून गेला परंतू युवराज मात्र पूरता घाबरला
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग २: लक्ष्मणच्या अंघोळीने थांबला होता चालू कसोटी सामना
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते