-महेश वाघमारे
आधुनिक क्रिकेटमध्ये सर्व संघांच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण एकदम मैत्रीपूर्ण आणि खेळीमेळीचे असलेले दिसून येते. टीम इंडिया देखील अगदी पहिल्यापासून एकोप्याने राहते. २००० नंतर तर ड्रेसिंग रूममध्ये वरिष्ठ- कनिष्ठ असला कसलाच भेदभाव उरला नाही. पण, याची मुहूर्तमेढ नव्वदच्या दशकात रोवली गेली होती.
१९९४ साली भारतीय क्रिकेट संघ न्युजीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. एक कसोटी आणि ४ वनडे असा छोटासा दौरा होता. मोहम्मद अझरूद्दीन भारताचा कर्णधार होता. भारताचे महान अष्टपैलू आणि १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव हे अखेरच्या वेळी न्यूझीलंडमध्ये खेळणार होते. अझरुद्दीनच्या नेतृत्वात भारतीय संघ बऱ्यापैकी चांगली कामगिरी करत होता. सचिन, अजय जडेजा, श्रीनाथ, विनोद कांबळी, सलील अंकोला यांसारखे खेळाडू आणि त्यांची खेळण्याची पद्धत हे सर्व प्रेक्षकांना आवडू लागले होते. एकूणच, क्रिकेटचे नवे युग सुरू झाले होते.
१४ जणांच्या चमूत जवळजवळ ९- १० जण एकदम तरुण होते. ह्या तरुणांकडून काही चुकीचे घडू नये आणि कामगिरी सुधारावी म्हणून प्रशिक्षक आणि मॅनेजर म्हणून अजित वाडेकर यांना संघासोबत पाठवण्यात आले होते. वाडेकर यांच्याबद्दल सर्व खेळाडूंना नितांत आदर होता आणि त्यांचा शब्द म्हणजे बरेच क्रिकेटपटू ब्रह्मवाक्य समजायचे.
भारतीय क्रिकेट आणि मुंबई क्रिकेटमध्ये वाडेकर हे खूप मोठे नाव होते. परंतु या तरुणांच्या संघातील दोन जणांना त्यांना खाजगीत “जित्या” म्हणायची परवानगी होती. दोन खेळाडू होते सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. तिघेही मुंबईकर असल्याने त्या तिघांचे चांगले जमत. विशीचे सचिन आणि विनोद पन्नाशी गाठलेल्या वाडेकर यांना एकेरी नावाने बोलत पण, त्यामागे त्यांचे प्रेम तसेच गुरू-शिष्याचे नाते होते.
खाजगीत मैत्री असली तरी, ज्यावेळी सरावासाठी खेळाडू मैदानात उतरत त्यावेळी मात्र, वाडेकर यांच्यातील कडक शिस्तीचा हेडमास्तर बाहेर येई. तेथे सचिन-विनोद असो, नाहीतर अझर-कपिल सर्वांना समान न्याय. ठरवून दिलेला वेळ सराव करावाच लागे. त्याच्यात अजिबात दयामाया दाखवली जात नसत. इतके सगळे असूनही वाडेकर मात्र सर्व खेळाडूंचे आवडते होते.
एकमेव कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर एकदिवसीय मालिका होती. ही मालिका जिंकलीच पाहिजे असा वाडेकरांचा अट्टाहास होता. ते खेळाडूंकडून मेहनत करून घेत. असेच एक मोठे सराव सत्र संपल्यानंतर सर्व खेळाडू हॉटेलवर गेले. वाडेकर देखील जेवण करून झोपले होते.
अचानक, मध्यरात्री त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजला. वाडेकरांनी घड्याळात पाहिले तर नुकतेच बारा वाजून गेले. त्यांनी दरवाजा उघडला तर दारात सचिन उभा होता. दरवाजा उघडताच सचिन पटकन बोलला,
“जित्या, कपिल पाजींची तब्येत अचानक बिघडली त्यांना कसला तरी त्रास होतोय. चल लवकर.”
वाडेकरांना काही समजेना. कारण, संध्याकाळच्या सराव सत्रात कपिल एकदम फिट होता आणि अचानक काय झाले? तसाच दरवाजा ओढून वाडेकर लगबगीने सचिनसोबत गेले. कपिल देव यांची खोली खालच्या मजल्यावर होती.
वाडेकर आणि सचिन खोलीत आले तर, कपिल देव यांना काहीही झाले नव्हते. मात्र, संघातील सर्व खेळाडू त्यांच्या खोलीतच होते. खरंतर त्यादिवशी १ एप्रिल होता आणि त्याच दिवशी अजित वाडेकर यांचा वाढदिवसदेखील असे. वाडेकर यांनाच एप्रिल फुल बनवण्यात आले होते.
त्यानंतर, सर्वांनी मिळून केक कापला, शॅम्पेन उडवले गेले, थोडीफार मस्ती केली गेली. अचानक काही वेळाने रूममध्ये बेली डान्सर दाखल झाल्या. सर्व खेळाडूंनी वाडेकर यांना त्यांच्यासोबत नाचण्याचा आग्रह केला. थोडावेळ सर्वांनी डान्स केल्यानंतर पार्टीची सांगता वाडेकर यांच्याच आदेशाने झाली.
खरंतर, हे सगळे नियोजन त्या दौऱ्यावर समालोचक म्हणून आलेले सुनील गावसकर यांचे होते. पण, इतके सगळे नियोजन अजिबात वाया जाऊ नये म्हणून, वाडेकरांचा आवडता खेळाडू आणि मित्र सचिन याने मध्यस्थी केली.
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स लेखमालेतील अन्य लेख-
-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १०: “जित्या, कपिल पाजींची तब्येत अचानक बिघडली आहे, चल लवकर.”
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ९: खेळाडू शांत व्हायचे नाव घेत नव्हते, अखेर सुत्र सचिनने हाती घेतली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ७: …आणि १८ वर्षांचा विराट पडला सचिनच्या पाया
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन त्यांनी गांगुलीला रडवले
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ५- त्यादिवशी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये निवडणूक झाली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३: दादा गुडनाईट बोलून निघून गेला परंतू युवराज मात्र पूरता घाबरला
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग २: लक्ष्मणच्या अंघोळीने थांबला होता चालू कसोटी सामना
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते