---Advertisement---

जसप्रीत बुमराहची धुलाई; लज्जास्पद विक्रमाची नोंद, किवी फलंदाजाने एका षटकात इतक्या धावा ठोकल्या

On: रविवार, फेब्रुवारी 1, 2026 12:41 PM
---Advertisement---

तिरुवनंतपुरम येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाचव्या व अंतिम टी20 सामन्यात गोलंदाजांची अक्षरशः धुलाई झाली. भारतीय असो वा किवी सामन्यात धावांचा वर्षाव झाला की कोणताही गोलंदाज बचावला नाही. विशेष म्हणजे, नेहमीच किफायतशीर गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा जसप्रीत बुमराह या सामन्यात आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात महागडा स्पेल टाकला.

बुमराहने आपल्या चार षटकांत तब्बल 58 धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने यापूर्वी कधीही इतक्या धावा दिल्या नव्हत्या. याआधीचा त्याचा सर्वात महागडा स्पेल 2021 च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होता, तेव्हा त्याने 56 धावा दिल्या होत्या. या सामन्यात बुमराहच्या नावे आणखी एक नकोसा विक्रम नोंदला गेला. त्याने एका षटकात 22 धावा दिल्या, जे त्याचे टी20 आंतरराष्ट्रीयमधील सर्वात महागडे षटक ठरले. हे षटक डावातील चाैदावे होते. समोर डॅरिल मिचेल फलंदाजी करत होता. त्याने या षटकात चौकार, सलग दोन षटकार, पुन्हा चौकार खेचत बुमराहला अडचणीत आणला. यापूर्वी 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध बुमराहने एका षटकात 21 धावा दिल्या होत्या.

फक्त बुमराहच नव्हे, तर इतर भारतीय गोलंदाजही या सामन्यात महागडे ठरले. अर्शदीप सिंगने पाच विकेट्स घेतल्या खऱ्या, पण त्यासाठी त्याला 51 धावा द्याव्या लागल्या. मात्र, अक्षर पटेल (4 षटकांत 33 धावा, 3 विकेट्स), वरुण चक्रवर्ती (36 धावा, 1 विकेट) आणि हार्दिक पांड्या (2 षटकांत 15 धावा) तुलनेने किफायतशीर ठरले. वेगवान गोलंदाजांची ही कामगिरी टी20 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकते, मात्र संघातील संतुलनामुळे फिरकीपटूंनी परिस्थिती सावरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 विकेट्स गमावून 271 धावांचा डोंगर उभारला. ज्यामध्ये ईशान किशनने शतक झळकावले, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली. शेवटी हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग यांनी फटकेबाजी करत मोठी धावसंख्या उभारली. 272 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडनेही आक्रमक सुरुवात केली, मात्र अखेरच्या षटकांत अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंगच्या माऱ्यापुढे किवी संघ 225 धावांत सर्वबाद झाला. भारताने हा सामना 46 धावांनी जिंकत मालिका 4-1 अशी आपल्या नावावर केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---